आपला चातुर्मास : तस्मै श्री गुरूवे नम:

-अरुण गोखले

आपल्या चातुर्मासाचा प्रारंभ हा आषाढी एकादशी अर्थात शयनी एकादशी ह्या दिवसापासून होतो. त्यानंतरच्या ह्या विशिष्ट उपासनेच्या काळातला पहिला जर कोणता महत्त्वाचा दिवस येत असेल तर तो गुरूपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत देवदेवता ह्यांना जितकं महत्त्व आहे. त्यापेक्षा थोडं अधिक महत्त्व आहे गुरू आणि सद्‌गुरूंना आणि त्यांच्या पूजनाला. त्या आदरणीय, वंदनीय गुरूपूजनाचा दिवस म्हणजेच गुरूपौर्णिमा.

आपलं जीवन आणि गुरू ह्याचे एक अतूट असे नाते आहे. गुरू आणि सद्‌गुरू ह्या दोघांचीही आपल्याला नितांत गरज असते. आपली प्रथम गुरू असते ती म्हणजे आई. आई मुलाला खायला, चालायला, बोलायला शिकविते. दुसरा गुरू म्हणजे पिता, तो मुलांवर सुसंस्कार करतो, मुलाला योग्य उपदेश करतो, व्यवहार ज्ञानाचे धडे देतो. मूल शाळेत जाऊ लागले की विविध विषयांचे ज्ञान देणारे वेगवेगळे गुरूजन भेटतात.

लौकिक अर्थाने आपण आपलं जीवन जगत असताना त्यासाठी आवश्‍यक असणारे धन, पैसा कसा कमवायचा. ज्ञान, कला, गुण कसे मिळवायचे हे ज्ञान जे देतात ते हे शालेय किंवा महाविद्यालयीन गुरू. गुरू हे पद आहे. म्हणूनच त्या पदावरील शिक्षक-शिक्षिका दोघेही पूज्यच. त्यांच्याकडून आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस म्हणजेच गुरूपौर्णिमा.

मानवी जीवनात आपल्याला अशा व्यावहारिक गुरूंची जितकी गरज आहे त्यापेक्षाही परमार्थात आपल्याला कितीतरी जास्त गरज असते ती सद्‌गुरूंची. “मंत्रतंत्र उपदेशिते गुरू आहेत घरोघरी आयते। परि शिष्या मेळवी सद्‌वस्तू ते तो सद्‌गुरू जाणावा।।’ या नेमक्‍या शब्दांत समर्थ रामदासांनी गुरू आणि सद्‌गुरू कोण? हे सांगितलं आहे. आपल्या जन्माचं अंतिम साध्य काय, मी कोण? ईश्‍वराचा अन्‌ माझा संबंध काय? ईश्‍वरोपासना का करायची? हा प्राप्त जन्म कसा सार्थकी लावायचा हे जे शिकवतात, ते सद्‌गुरू.

ह्या दिवशी गुरू आणि सद्‌गुरूंचं भावपूजन केलं जातं, कृतज्ञताही व्यक्‍त केली जाते. मात्र त्यासाठी केवळ अशा गुरूंना फुलं देणं, वस्तू देणं, हार, नारळ, पेढे देणं हे काही खरे गुरूपूजन नाही, त्या झाल्या बाह्यखुणा. खरी खूण असते ती नमस्काराच्या कृतीतून व्यक्‍त होणाऱ्या शरणांगत भावाची, आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या, बोधाच्या, शिकवणीच्या उपासनेच्या खऱ्या आचरणाची.

Leave A Reply

Your email address will not be published.