खाद्यतेलाचे दर भडकले; गृहिणींच्या अडचणीत वाढ

पिंपरी – गेल्यावर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खाद्यतेलाचे दर चांगलेच भडकले आहेत. प्रति लिटर 120 ते 170 रुपयांपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या दरामध्ये प्रति लिटरमागे 40 ते 60 रुपयांची दरवाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझलचे दर वाढले असताना खाद्यतेलही त्यात मागे राहिलेले नाही. गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अचानकच तेलाची मागणी वाढली आणि दर वाढविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आजपर्यंत सातत्याने हे दर कमी-जास्त प्रमाणात वाढतच आहेत. वेगवेगळी कारणे देत खाद्यतेल दराचा नवा उच्चांक स्थापित करत आहे. परंतु, एकाच वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच झाली नव्हती, नागरिक आणि लहान व्यापारीदेखील सांगत आहेत.

सर्वाधिक मागणी असलेले सूर्यफूल तेल वर्षभरापूर्वी 100 रुपये प्रति लिटर होते. सहा महिन्यांपूर्वी हा दर 130 रुपये प्रति लिटर झाला आणि सध्या 165 ते 170 रुपये दराने तेल विकले जात आहे. सहा महिन्यांमध्ये सूर्यफूल तेलाच्या भावामध्ये 35 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या महागाईचा विस्फोट झाला आहे. त्यातच खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणींच्या चिंतेत भरच पडली आहे.

सोयाबीन तेल सध्या 130 ते 135 रुपये लिटरमध्ये मिळत आहे. गतवर्षी 80 ते 85 रुपये लिटरपर्यंत उपलब्ध होते. पामतेल 120 रुपये लिटरपर्यंत सध्या उपलब्ध आहे. गतवर्षी 80 ते 85 रुपये लिटरपर्यंत हे तेल मिळत होते. शेंगदाणा तेल 165 ते 170 रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. गतवर्षी शेंगदाणा तेल 100 ते 110 रुपयांपर्यंत मिळत होते.

विदेशातील आयात घटल्याने आणि देशातही खाद्यतेलाचे उत्पादन कमी झाल्याने खाद्यतेलामध्ये सध्या भाववाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यांत खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत. जून आणि जुलैपर्यंत हे भाव नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा आहे.
– श्‍याम मेघराजानी, कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड मर्चंट चेंबर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.