बेनामी मालमत्तांसाठी सायप्रस आणि दुबईमधून अर्थसहाय्याचा संशय
नवी दिल्ली – रॉबर्ट वढेरा यांच्यासंदर्भातील तपासाची व्याप्ती सक्तवसुली संचलनालयाने वाढवली आहे आणि वढेरा यांच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबत इंग्लंडमधील तपास संस्थांकडून माहिती मागवली आहे. इंग्लंडमधील तब्बल अर्धा डझन मालमत्तांबाबत ईडीने इंग्लंडमधील तपास संस्थांकडे विचारणा केली आहे. “मनी लॉंडरिंग’मधून मिळालेल्या पैशातून या मालमत्तांची खरेदी झाल्याचा ईडीला संशय आहे. याशिवाय ईडीने काही अन्य देशांच्या महसूली गुप्तचर विभागांकडेही सहाय्याची मागणी केली आहे. या मालमत्तांच्या खरेदीसाठी लागलेल्या निधीचे स्रोत उघड करण्यासाठी ईडीने हे प्रयत्न सुरू केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वढेरा यांच्याशी संबंधित लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामधील या मालमत्ता “पीएमएलए’ कायद्याखाली प्रतिबंधात्मक स्वरुपात ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली ब्लूप्रिंट तयार करण्याचे काम सध्या ईडीकडून केले जात आहे. वढेरा यांची लंडनमधील या मालमत्तांसंदर्भात ईडीकडून आतापर्यंत अनेकवेळेस चौकशी करून झाली आहे. लंडनमधील ब्रिस्टन स्क्वेअर येथील रहिवासी इमारतीची किंमत अंदाजे 1.9 दशलक्ष पौंड इतकी असल्याचा ईडीचा दावा आहे. 5 आणि 4 दशलक्ष पौंडांची 2 घरे आणि 6 अन्य फ्लॅटचा यामध्ये समावेश आहे. यासारख्या काही मालमत्तां वढेरा यांच्या मालकीच्या असल्याचे ठोस पुरावे ईडीच्या ताब्यात आले आहेत. या मालमत्तांच्या खरेदीसाठी सायप्रस आणि दुबई येथून पैसे पुरवण्यात आल्याचे इंग्लंडमधील तपास संस्थांना समजले आहे.
वढेरांच्या चौकशीदरम्यान या मालमतांबाबतची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे वढेरांचा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीने न्यायालयाकडे केली आहे. दुसरीकडे केवळ प्रसिद्धीसाठी आपल्याला ईडीकडून वारंवार चौकशीसाठी बोलावले जात असल्याचे वढेरा यांनी म्हटले आहे.