मुंबई : मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे.
आज ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे. टोरेस कंपनीने तब्बल १००० कोटींची ही फसवणूक केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात कंपनीशी निगडीत असणा-या तिघा जणांना पोलिसांनी अटक केले असून ते कोठडीत आहेत.
मुंबई आणि आसपासच्या एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन या टोरेस कंपनीने दिले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता ईडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या घोटाळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आज अंमलबजावणी संचालनालयाने (२३ जानेवारी) टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील दहा ठिकाणी छापा टाकला आहे.