नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित एनजीओवर छापे टाकले आहेत. जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशन (ओएसएफ) आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या बेंगळुरू येथील कार्यालयांवर आज छापे टाकले गेले.
ओएसएफने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी सांगितले की, परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात फेमा अंतर्गत लाभार्थ्यांच्या जागेवर झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांशी संबंधित लोकांचाही समावेश आहे. ईडीने अॅम्नेस्टी आणि ह्यूमन राईट्स वॉचच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या घरांचीही झडती घेतली.
ईडीच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की २०१६ मध्ये गृह मंत्रालयाने सोरोस ओएसएफला प्रायर रेफरन्स कॅटेगरीमध्ये ठेवले होते, ज्यामुळे ते भारतातील एनजीओंना अनियंत्रित देणग्या देऊ शकत नव्हते. या बंदीपासून बचाव करण्यासाठी मग ओएसएफने भारतातील त्यांच्या उपकंपन्यांद्वारे थेट परकीय गुंतवणूक आणि सल्लागार शुल्काच्या नावाखाली पैसे आणले आणि हा निधी एनजीओच्या कामांना निधी देण्यासाठी वापरला गेला. हा प्रकार फेमाचे उल्लंघन आहे.
सोरोस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंड म्हणजे एसईडीएफ आणि ओएसएफद्वारे आणलेल्या इतर एफडीआय निधीच्या अंतिम वापराची देखील ईडी चौकशी करत आहे. यासंदर्भात मेसर्स अस्पाडा इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडही ईडीच्या रडारवर आहे. ही कंपनी भारतातील एसईडीएफची गुंतवणूक सल्लागार- निधी व्यवस्थापक आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने डिसेंबर २०२० मध्येच भारतातील आपले उपक्रम थांबवले होते. बेकायदेशीर परदेशी निधीच्या आरोपांमुळे संस्थेची बँक खाती देखील गोठवण्यात आली होती.