नवी दिल्ली- मानवी हक्क विषयक कार्यकर्ते आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी हर्ष मंदर यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने आज छापे घातले. मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात हे छापे घालण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मंदर यांचे निवासस्थान आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावर हे छापे घालण्यात आले.
दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज, अदचिनी आणि मेहरौली भागातील काही ठिकाणांची मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हर्ष मंदर यांनी अनेक पुस्तके लिहीलेली आहेत. याशिवाय सामाजिक न्याय आणि मानवी हक्क या विषयावर ते वृत्तपत्रांमधून लेखनही करत असतात.
आजच ते आपल्या पत्नीसह जर्मनीला रवाना झाले आहेत.मंदर हे संचालक असलेल्या सेंटर फॉर इक्विटी स्टडीज या स्वयंसेव संस्थेच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.