नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर कोलकतास्थित मोबाईल गेमिंग ऍप कंपनीचे प्रवर्तक आले आहेत. त्यावरून ईडीने शनिवारी टाकलेल्या छाप्यांवेळी तब्बल 17 कोटी रूपयांची रोकड जप्त केली. मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून ई-नगेटस् या कंपनीशी संबंधित चौकशी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ईडीने ती कंपनी, प्रवर्तक आमीर खान आणि इतरांशी संबंधित अर्धा डझन ठिकाणी छापे टाकले. त्या कारवाईवेळी आढळलेल्या 500 रूपये नोटांच्या बंडलांचा ढिगारा दर्शवणारा फोटो ईडीने प्रसिद्ध केला.
त्यासमवेत 2 हजार आणि 200 रूपयांच्या काही नोटाही हस्तगत करण्यात आल्या. रोकड मोजण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी 5 काऊंटिंग मशिन्सच्या सहाय्याने नोटा मोजल्या. छापासत्रावेळी ईडी पथकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात करण्यात आले होते. ऍप कंपनीच्या प्रवर्तकाचे राजकीय लागेबांधे असल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान, त्या प्रवर्तकांशी कुठलाही संबंध नसल्याचे पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.