मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. कोहिनुर प्रकरणी ईडीकडून ही नोटीस जारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे परंतू, मनसेकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
कोहिनुर प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांनादेखील ईडीने नोटीस जारी केले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर लोकसभा निवडणुकीत टीका केल्याने त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे जराही आश्चर्य वाटत नाही कारण सरकार सूडाचे राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग असल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.