कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून छाप्यांचे सत्र

मुंबई आणि परभणीमध्ये 9 ठिकाणी छापे

गंगाखेड साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरण

मुंबई/ नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या नावे घेण्यात आलेल्या आणि काही राजकीय नेत्यांशी संबंधित कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाने आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी छापे घातले. मुंबई आणि परभणी या ठिकाणी 9 ठिकाणांवर ईडीने छापे घातले. या संदर्भात “पीएमएल’ कायद्याखाली गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “गंगाखेड शुगर ऍन्ड एनर्जी लिमिटेड’चे प्रवर्तक रत्नाकर गुट्टे यांच्या प्रकरणाशी संबंधित हे छापे घालण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईतून मिळालेल्या माहितीमधून पुरावे शोधण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांनी 5,400 कोटी रुपयांचे कर्ज मिळवले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने गेल्यवर्षी केला होता. 2015 साली गंगाखेड साखर कारखान्याने 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे बॅंकांमधून शेती आणि वाहतुकीसाठीचे कर्ज मिळवले होते. या शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून कर्जवसुलीसाठी नोटीसा पाठवल्या जाऊ लागल्या आहेत.

या कर्जांपैकी काही कर्जांची रक्कम खूप जास्त म्हणजे 25 लाख रुपयांइतकी आहे, असा दावा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी “एफआयआर’देखील दाखल करून घेतली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.