मुंबई – महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध केला आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला, तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने तात्काळ सुटकेचा त्यांचा अंतरिम अर्ज फेटाळला होता. ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.
जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तपासाच्या या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. अशा स्थितीत योग्य न्यायालयात जामीन अर्ज दाखल करावा. जामीन अर्जात मलिक यांच्या वतीने म्हटलं होतं की, पीएमएलए कायदा २००५ चा आहे. मात्र 1999 मध्ये झालेल्या व्यवहाराप्रकरणी आपल्याला अटक करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संलग्न मालमत्तांच्या खरेदीत पैशाच्या गैरवापराशी संबंधित आहे.