नवी दिल्ली – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपिंदरसिंह हुडा यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. औद्योगिक वापरासाठीच्या जमीन वाटपातील अनियमिततांशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले.
हुडा मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये पंचकुला येथे 30 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या डझनभरापेक्षा अधिक औद्योगिक प्लॉटस्चे वाटप झाले. त्या प्रक्रियेत लायक अर्जदारांना डावलून हुडा यांच्या निकटवर्तीयांना झुकते माप देण्यात आले, असा ईडीचा दावा आहे. त्याप्रकरणी हरियाणा दक्षता विभागाने 2015 मध्ये गुन्हा दाखल केला.
त्यानंतर सीबीआय आणि ईडीने तपास हाती घेत स्वतंत्र गुन्हे दाखल केले. आता ईडीने पंचकुलामधील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये हुडा यांच्याबरोबरच भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) चार निवृत्त अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलनावरून याआधीच हरियाणातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता हुडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याने तेथील राजकारणही तापण्याची चिन्हे आहेत.