EDची मोठी कारवाई: माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांची 12 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि इतरांची सुमारे 12 कोटी रूपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटनेतील आर्थिक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली.

ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत जम्मू आणि श्रीनगरमधील मालमत्तांवर टाच आणली. त्यामध्ये दोन निवासी इमारतींचा आणि व्यावसायिक वापराच्या एका इमारतीचा समावेश आहे. त्याशिवाय, तीन भूखंडही जप्त करण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची कागदोपत्री किंमत 11 कोटी 86 लाख रूपये आहे. मात्र, त्यांचे सध्याचे बाजारमूल्य 70 कोटी रूपयांच्या घरात असल्याचे समजते. संबंधित प्रकरणी ईडीने याआधी अब्दुल्ला यांची चौकशीही केली आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये क्रिकेटला चालना देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनेक पाऊले उचलली.

त्याचाच भाग म्हणून जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटनेला 2002 ते 2011 या कालावधीत 113 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. त्यातील 43 कोटी रूपयांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. तो घोटाळा झाल्याच्या काळात अब्दुल्ला जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्या घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडीकडून केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.