नवी दिल्ली : मनी लॉंड्रिंग प्रकरणात अण्णा द्रमुकचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आर. वैथिलिंगम यांची १०० कोटींहून अधिक मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बुधवारी जप्त केली आहे. यात तिरुचिरापल्ली येथील स्थावर मालमत्तेसह मुथाम्मल इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या काही कार्यालयांचा समावेश आहे.
मनी लाँड्रिंगच्या खटल्यात ईडीने दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे. या खटल्यात आर. वैथिलिंगम यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीराम प्रॉपर्टीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडून रिअल इस्टेट प्रकल्पासाठी नियोजन परवानगी देण्याच्या बदल्यात २७.९० कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीही ऑक्टोबर २०२४ मध्ये ईडीने चेन्नई आणि तंजावर येथे आर. वैशिलिंगम आणि काही संशयीतांवर छापे टाकले होते. दरम्यान, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय असलेले आर. वैथियलिंगम हे ओरथानाडू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पक्षप्रमुख एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यातील नेतृत्व संघर्षादरम्यान २०२२ मध्ये त्यांना अण्णा द्रमुकमधून काढून टाकण्यात आले होते. ते गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री राहिले आहेत.