देशभरातील व्यापाऱ्यांकडून चिनी वस्तूंची होळी

दहशतवादावर चीनच्या भूमिकेचा व्यापाऱ्यांकडून विरोध

नवी दिल्ली – दहशतवादाबाबत चीन सरकार भारताच्या विरोधात भूमिका घेत असल्याबद्दल देशातील व्यापाऱ्यांनी असंतोष व्यक्‍त केला आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहर या दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी बऱ्याच देशांनी प्रयत्न केले होते. मात्र, चीनने यात अडथळा आणला. त्यामुळे अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करता आले नाही. याचा विरोध म्हणून देशातील छोट्या व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची होळी केली असल्याचे व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या सीएआयटीआय संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

चीनला धडा शिकवण्यासाठी चीनबरोबरचा व्यापार कमी करावा अशी आमची इच्छा आहे, असे खंडेलवाल यांनी सांगितले. दिल्लीसह देशातील 1500 ठिकाणी व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची होळी केली असल्याचे ते म्हणाले. दिल्लीत सदर बाजार येथे व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची होळी केली. त्यांनी सांगितले की, भारतातील छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांवर बरच कर्जाचा बोजा आहे. त्याचबरोबर भांडवल सुलभता नाही. त्यामुळे आम्ही तयार केलेल्या वस्तू तुलनेने महागात पडतात.

मात्र, भारतील उत्पादनाच्या चीनच्या वस्तू स्वस्त पडतात. त्यासाठी भारतातील छोट्या उद्योगांना स्वस्तात कर्ज द्यावे आणि इतर सवलती द्याव्या म्हणजे आम्ही चिनी वस्तूबरोबर स्पर्धा करू शकू असे त्यांनी सांगितले. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घेणार आहोत, असेही त्यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगितले.

भारत आणि चीनदरम्यानचा व्यापार गेल्या अनेक वर्षांपासून असंतुलित पद्धतीने चालत आहे. वार्षिक पातळीवर गेल्या वर्षी या व्यापारात तब्बल 18 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन तो 84 अब्ज डॉलर इतका झाला आहे. मात्र, या व्यापारातील तूट 51 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यामुळे हा व्यापार संतुलित करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. असे असतानाही भारताला चीन अनेक आघाड्यांवर जागतिक पातळीवर विरोध करीत आहे. अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळू नये यासाठी चीनने गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यातच आता दहशतवादाबाबत ही भारताला त्रास होईल अशी भूमिका चीन घेत आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकविण्याची गरज आहे असे या संघटनेला वाटते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)