Economy news – पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने तिसर्या तीमाईचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बँकेचा नफा 36 टक्क्यांनी वाढून 1,406 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेला 1,036 कटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 6,325 कोटी रुपये झाले आहे. जे की गेल्या वर्षी या तिमाहीत 5,171 कोटी रुपये होते.
बँकेने कर्ज वसुलीवर लक्ष दिले आहे. त्याचबरोबर नवीन कर्ज देताना काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता या तिमाहीत कमी होऊन 1.80 टक्के झाली आहे. जी की गेल्या वर्षी यात तिमाहीत 2.04% होती. त्याचबरोबर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.2% भरली आहे. गेल्या वर्षी यात तिमाहीत निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.22% होती.
ताळेबंद जाहीर करताना महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी सांगितले की, महाराष्ट्र बँक विविध स्त्रोतातून लवकरच भांडवल उभारणी करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतील केंद्र सरकारचा हिस्सा 75% पेक्षा कमी होईल. शेअर बाजार नियंत्रक सेबीने सरकारचा बँकेतील हिस्सा 75 टक्के पेक्षा कमी करण्याचा नियम जारी केलेला आहे. सध्या महाराष्ट्र बँकेत केंद्र सरकारचे भाग भांडवल 79.6% आहे. सप्टेंबरअखेर बँकेत केंद्र सरकारचे भाग भांडवल 86.46% होते. मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये बँकेने 3,500 कोटी रुपयाचे भांडवल संस्थागत गुंतवणूकदाराकडून उभे केले आहे.
लवकरच बँक संस्थागत गुंतवणूकदाराकडून किंवा इतर गुंतवणूकदाराकडून कधी आणि किती रक्कम घ्यायची या संदर्भातील निर्णय घेणे अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात भाग भांडवल उभे करण्यास वेळ कमी आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात कधीतरी हे भाग भांडवल उभारले जाऊ शकेल. या अगोदरच्या भांडवल उभारणीला देशातील आणि परप्रदेशातील गुंतवणूकदाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळातही उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इन्फोसिसच्या नफ्यात 11.5 टक्के वाढ –
देशातील आणि परदेशातील आर्थिक परिस्थिती खराब असतानाही इन्फोसिस कंपनीने तिसर्या तिमाहीत मिळविलेल्या नफ्यात 11.5% वाढ झाली. या तिमाहीत कंपनीला 6,806 कोटी रुपयांचा नफा झाला.
गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 6,106 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल 7.58 टक्क्यांनी वाढून 41,764 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमहीत कंपनीचा महसूल 38,821 कोटी रुपये होता असे कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे. या तिमाहीत कंपनीच्या कर्मचार्यांची संख्या 5,551 ने वाढून 32,379 इतकी झाली आहे. इतर कंपन्यानी कर्मचारी भरती टाळली होती. मात्र इन्फोसिसने कर्मचारी भरतीवर फारसा परिणाम होऊ दिलेला नाही असे दिसून येते.
या ताळेबंदाबाबत समाधान व्यक्त करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सेवांमध्ये वैविध्य आणले आहे. त्यामुळे जागतिक परिस्थिती खराब असूनही कंपनीला या तिमाहीत चांगली कामगिरी करता आली आहे. कंपनीने नव्या तंत्रज्ञानावर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. जागतिक परिस्थिती सुधारली तर कंपनीचा महसूल आणि नफा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात टीसीएस कंपनीने ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातही नफा वाढला असल्याची आकडेवारी जाहीर झाली होती.
अदानी समूहाचे शेअर तेजीत
अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या दोन दिवसापासून वाढ होत होती. आजही या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. अमेरिकेतील हिंडेेनबर्ग या समूहाने अदानी समूहा विरोधात गैरव्यवहाराचे आरोप केले होते. आता हिंडेनवर्गने आपले काम समाप्त केले असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून येते.
दीड वर्षांपूर्वी हिंडेेनबगने यांच्या विरोधात आरोप केल्यानंतर या समूहातील बर्याच कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यानंतर काळाच्या ओघात ही तूट भरून आली. त्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयात अदानी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही या समूहाच्या शेअरवर बराच परिणाम झाला होता. मात्र आता तो घसारा भरून निघत आला आहे.
हिंडेेनबर्ग समूहाने अदानी समूहातील कंपन्या शेअरचे भाव वाढविण्यासाठी गैरमार्गाचा वापर करीत असल्याचा आरोप केला होता. हे आरोप अदानी समूहाने वेळोवेळी फेटाळले होते. त्यानंतर हिंडेेनबर्ग समूहाने शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्ष मधाबी पुरी बुच यांच्याबाबतही आरोप केले होते. मात्र आता हिंडेेनबर्ग समूहच समाप्त झाला असल्यामुळे आता या आरोपाचा पाठपुरावा होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
या घटनाक्रमामुळे अदानी समूहातील एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरचा भाव 9.15 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरचा भाव 3.88 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरचा भाव 3.35 टक्क्यांनी, सांघी इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरचा भाव 3.35 टक्क्यांनी. अदानी पावर कंपनीच्या शेअरचा भाव 2.45 टक्क्यांनी वाढला.
मुख्य निर्देशांकात समाविष्ट असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा भाव 1.78 टक्क्यांनी, अदानी एंटरप्राईजेस या कंपनीच्या शेअरचा भाव 1.74 टक्क्यांनी. अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअरचा भाव 1.54 टक्क्यांनी व एससीसी कंपनीच्या शेअर्सचा भाव 1.77 टक्क्यांनी वाढला. या समूहातील अदानी विल्मार कंपनीच्या शेअरचा भाव 1.19 टक्क्यांनी कमी झाला. या कंपनीतील आपले भागभांडवल अदानी समूह कमी करणार आहे. अदानी समाजतील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे या समूहाचे बाजार मूल्य वाढून 12.92 लाख कोटी रुपये झाले.
सेबीकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर
जास्तीत जास्त भारतीय नागरिकांना शेअर बाजाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करता यावी यासाठी शेअर बाजार नियंत्रक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास मदत मिळत आहे, असे शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्षा मधाबी पुरी बुच यांनी सांगितले.
सेबीने यासंदर्भात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बुच यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजार तंत्रज्ञान वापरात कुठेही मागे राहणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचे ठरविले आहे आणि याचा आम्हाला उपयोग होत असल्याचे आढळून येत आहे.
आयपीओसाठी अर्ज आल्यानंतर या अर्जाची छाननी करून परवानगी देण्यासाठी अगोदर बराच काळ लागत होता. मात्र आता तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होत आहे. सेबी कृत्रिम बुद्धिमत्तातंत्रज्ञानाचा वापर करीत असल्यामुळेच हे शक्य असल्याचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इन्फोसिस कंपनीचे माजी अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोक उत्तम प्रतिसाद देत असून हे तंत्रज्ञान वापरण्याची त्यांची इच्छा वाढली असल्याचे यातून स्पष्ट होते. मात्र याचा दुरुपयोग केला जाणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी 40 हजार कोटी
नवी दिल्ली, दि. 16 – रस्ते खराब पद्धतीने उभारल्यामुळे सर्वात जास्त अपघात होतात. यामुळे संबंधित कुटुंबाबरोबरच अर्थव्यवस्थेचे नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारचे सदोष रस्ते तयार करणे हा अजामीनपात्र गुन्हा समजण्याची गरज आहे. अशा व्यक्तींना कारागृहात पाठविण्याची गरज असल्याचे मत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सध्या देशातील ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकार 40 हजार कोटी रुपये खर्च करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय उद्योग महासंघाने या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, सदोष रस्त्यामुळे भारतात सर्वात जास्त अपघात होतात. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांना, अभियंत्यांना शिक्षा होण्याची गरज आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व बाबींचा अभ्यास केला असून अपघाताचे प्रमाण 2030 मध्ये निम्म्यावर आणण्याचा संकल्प करण्यात आल आहे. 2023 मध्ये उपलब्ध माहितीनुसार देशात पाच लाख रस्ते अपघात झाले. त्यामध्ये एक लाख 72 हजार लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या फारच जास्त आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यापैकी 66.4 टक्के लोक म्हणजे 1 लाख 14 हजार लोक हे 18 ते 45 वयोगटातील आहेत. तर दहा हजार मुले अपघातात मृत्युमुखी पडली आहेत.
55,000 अपघात हेल्मेट न वापरल्यामुळे झाले आहेत. तर तीस हजार अपघात सीट बेल्ट न वापरल्यामुळे झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. देशामध्ये व्यावसायिक ड्रायव्हरचे प्रमाण फारच कमी आहे. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची व प्रशिक्षणाची गरज आहे. केंद्र सरकार ही तूट भरून काढू शकत नाही. यासाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
रुपयातच्या माध्यमातून परकीय व्यापार वाढविण्याचा प्रयत्न
डॉलरऐवजी विविध देशांबरोबर रुपयाच्या माध्यमातून किंवा इतर चलनातून व्यापार करण्यासाठी अतिरिक्त उपाय योजना रिझर्व बँकेने जारी केल्या. यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्याचे संवर्धन होईल आणि रुपया बळकट होईल अशी भूमिका आहे.
सोमवारी भारतीय रुपयाचे मूल्य 86 रुपये 70 पैसे प्रति डॉलर या निचांकी पातळीवर गेल्यानंतर या विषयावर अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँकेकडून काही उपाय योजना केल्या जाणे अपेक्षित होते. त्यानुसार आज रिझर्व बँकेने या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परस्परांच्या चलनातून व्यापार करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने संयुक्त अरब अमीरात, इंडोनेशिया, मालदीव या देशातील रिझर्व बँकेबरोबर परस्पर सहकार्य करण्याचे करार केले आहेत. या कराराची आता अधिक आग्रही अंमलबजावणी केली जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रुपयाच्या माध्यमातून जागतिक व्यापाराचे पेमेंट देण्यासाठी जुलै 2022 मध्ये रिझर्व बँकेने विशेष रुपया वोस्त्रोे खाते सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. जगातील अनेक बँकांनी अशा प्रकारचे खाते भारतीय बँकांबरोबर उघडले. या खात्याच्या माध्यमातून संबंधित देशाच्या चलनाच्या माध्यमातून व्यापार केला जाऊ शकत आहे. याचा वापर आगामी काळात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे दिसून येते.
या माध्यमातून केवळ व्यापाराचे पेमेंट करता येणार नाही तर भारतात गुंतवणूकही करता येणार आहे. त्यामुळे भारताकडून व्यापारासाठी आणि गुंतवणुकीसाठी डॉलरचा वापर कमी केला जाईल आणि भारतीय रुपयाचे अवमूल्यन अधिक होणार नाही अशी अपेक्षा आहे.
रिझर्व बँकेने असेही स्पष्ट केले आहे की, भारतीय निर्यातदारांना परदेशात खाते सुरू करता येईल आणि या खात्याच्या माध्यमातून रुपयातून व्यापाराचे पेमेंट देता येईल. त्यामुळे निर्यात आणि आयातीसाठीही रुपयाचा वापर केला जाऊ शकेल.त्यासाठी परकीय चलन नियमन कायद्यामध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला आहे.
रुपयाच्या मूल्यात 16 पैशांची घट
दरम्यान गुरुवारी चलन बाजारात भारतीय रुपयाचे मूल्य 16 पैशांनी कमी होऊन 86 रुपये 56 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेले. गेल्या दोन दिवसात रुपयाच्या मूल्य काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र आज पुन्हा रुपयाचे मूल्य घसरले. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले असूनही परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे आणि खनिज तेलाचे दर जास्त असल्यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होत आहे.
वाहन उद्योगाचे जागतिक प्रदर्शन शुक्रवारपासून
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोच्या दुसर्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी करणार आहेत. 17 जानेवारीपासून सुरू होणारे हे प्रदर्शन 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये देश विदेशातील वाहन कंपन्या सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात 100 नवी उत्पादने सादर केली जाणार आहेत. त्यामध्ये नव्या वाहनाबरोबरच वाहनाच्या सुट्या भागांचा समावेश आहे.
वाहन कंपन्यांबरोबरच या प्रदर्शनात वाहनासाठी लागणार्या सुट्या भाग निर्मात्या कंपन्या, टायर कंपन्या, वाहनासाठी सॉफ्टवेअर निर्माण करणार्या कंपन्या, वाहनासाठी इलेक्ट्रॉनिक भाग तयार करणार्या कंपन्या सहभागी होणार आहेत. याला जोडूनच भारतात दर दोन वर्षाला सादर होणारे ऑटो एक्सपो आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात जगभरातील 5,100 प्रतिनिधी सहभागी होणारा असून प्रदर्शनाला पाच लाख नागरिक भेट देण्याची शक्यता आहे.
या प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहनाकडे जास्त लक्ष दिले जाणार असून याच प्रदर्शनात मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटार आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करणार आहेत. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ इत्यादी कंपन्या आपली नवी उत्पादने सादर करतील. एकूण 40 नव्या कार या आठवड्यात या व्यासपीठावरून सादर केल्या जाणार आहेत. वाहनासाठीच्या सुट्या भागाचे एक वेगळे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये विविध देशातील 100 उत्पादक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या घेतल्या जाऊ शकतात.
सलग तिसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात झाली वाढ
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे सलग तिसर्या दिवशी भारतीय शेअर बाजारात खरेदी होऊन निर्देशांकात माफक वाढ होण्यास मदत झाली. अमेरिकेतील किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता वाढल्यामुळे शेअर बाजारात आशावादी वातावरण निर्माण झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 318 अंकांनी वाढून 77,042 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 98 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी वाढून 23,311 अंकावर बंद झाला.
आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक या ब्लुचिप कंपन्यासह एनटीपीसी, मारुती, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एअरटेल, बजाज फिन्सर्व्ह, स्टेट बँक अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
मात्र नेस्ले, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मेहता इक्विटी संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, अमेरिकेत वाढलेल्या महागाईमुळे व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे भारतासह इतर देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आणखी वाढणार नाहीत आणि अमेरिकन डॉलर अधिक वधारणार नाही अशी भावना जागतिक गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. आज झालेल्या खरेदीचा फायदा सेवा, धातू, दूरसंचार, भांडवली वस्तू या क्षेत्राला झाला तर माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू इत्यादी क्षेत्राचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
अॅक्सिस बँकेच्या नफ्यात माफक वाढ
खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा चार टक्क्यांनी वाढून 6,304 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 6,071 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहित बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 30,954 कोटी रुपये झाले आहे. जे की गेल्या वर्षी या तिमाहीत 27,961 कोटी रुपये इतके होते. यावर्षी डिसेंबरअखेर बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 1.46% आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ही अनुत्पादक मालमत्ता 1.58% इतकी होती. आता निव्वळ एनपीए केवळ 0.35% इतके नोंदले गेले आहे. गेल्या वर्षी निव्वळ एनपीए 0.36% होते. बँकेला खराब कर्जापोटी 2,156 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी हे रक्कम 1,028 कोटी रुपये होती.
वेदांत रिसोर्सेसकडून भांडवल उभारणी
अनिल अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत रिसोर्सेस कंपनीने जागतिक पातळीवर कर्जरोख्यांच्या माध्यमातून 1.1 अब्ज डॉलरची भांडवल उभारणी केली आहे. सप्टेंबरपासून या कंपनीने केलेल्या भांडवल उभारणीचे रक्कम आता 3.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 1.1 अब्ज डॉलरच्या बॉण्डसाठी 3.4 अब्ज डॉलर गुंतवणूकदाराकडून देऊ करण्यात आले. या निधीचा वापर ही कंपनी या अगोदर घेतलेल्या कर्जाच्या फेररचनेसाठी किंवा परतफेढीसाठी करणार असल्याचे सांगण्यात आले. या रोखे खरेदीत अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि मध्य आशियातील गुंतवणूकदारांनी भाग घेतला.