नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगो या कंपनीचा नफा तिसर्या तिमाहीत 18.3 टक्क्यांनी कमी होऊन 2,448 कोटी रुपये इतका झाला आहे. इंडीगोची बरीच मोठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे. भारतीय रुपयाचे मूल्य या कालावधीत कमी झाले आहे. अशा अवस्थेत या कंपनीला इंधनापोटी अधिक खर्च करावा लागत असल्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6% वाढून 22,992 कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र तरीही कंपनीच्या नफ्यावर मात्र नकारात्मक परिणाम झाला आहे. या तिमाहीत देशातील आणि परदेशातील 31.1 दशलक्ष प्रवाशांनी या विमान सेवेचा लाभ घेतला. आगामी काळामध्ये कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली. कंपनीकडे 437 विमाने आहेत.
पतंजलीची चार टन मिरची पावडर खराब –
पतंजली फुड्सने अगोदरच बाजारात विकलेली चार टन मिरची पावडर खराब असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीने संबंधित ग्राहकांना ही मिरची पावडर परत करण्याचे आणि पैसे परत घेऊन जाण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात अन्न नियंत्रकांनी आदेश दिल्यानंतर पतंजली फुडने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अस्थाना यांनी सांगितले की, अन्न नियंत्रकांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही चार टन मिरची पावडर परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ही मिरची पावडर 200 ग्रॅमच्या पाकिटात विकली आहे. या मिरची पावडर मध्ये कीटकनाशकाचे प्रमाण जास्त आढळले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही वितरकांना कळविले आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रात जाहिरातीत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
हवाई प्रवासी वाहतुकीत वाढ
भारताच्या देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत गेल्या वर्षभरात 6.12 टक्क्याची वाढ झाली. गेल्या वर्षी 16 कोटी 13 लाख प्रवाशांनी हवाई मार्गांचा वापर केला. गेल्या वर्षात देशांतर्गत उड्डाणं रद्द झाल्याचं प्रमाण 1.7 टक्के इतकं होतं. त्यामुळे 67 हजार 622 प्रवाशांना फटका बसला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.
अदानीकडून अमेरिकेतील खटल्याबाबत लॉ फर्मची नियुक्ती
अमेरिकेतील एका न्यायालयात अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी त्यांचे नातेवाईक आणि इतर वरिष्ठ अधिकार्याविरोधात 265 दशलक्ष डॉलरची लाच देण्याच्या प्रकरणावरून खटला नोंदण्यात आलेला आहे. या खटल्याचा आढावा घेण्यासाठी अदानी समूहाने एक स्वतंत्र लॉ फर्मची निवड केली असल्याचे या समूहाने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे.
अदानी समूहामध्ये अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीच्या संबंधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या कंपनीच्या वतीने काही जणांनी सरकारी अधिकार्यांना लाच दिली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या अगोदरच अदानी समूहाने हे आरोप फेटाळल आहेत आणि आज शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतही या समूहाने आपल्यावरील आरोप नाकारले आहेत.
या कंपनीने आपल्या मुख्य कंपनीसोबत चर्चा करून लॉ फार्मची निवड केली असल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. याची माहिती या कंपनीच्या प्रवक्तयाने पत्रकात किंवा प्रत्यक्ष दिलेली नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये न्यूयॉर्क येथील न्यायालयामध्ये हा खटला नोंदविण्यात आला होता. त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. यामुळे या कंपनीला पुढील वीस वर्षात दोन अब्ज डॉलरचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. हे आरोप अदानी समुहाने फेटाळले आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधितांना आवश्यक माहिती वेळोवेळी दिली असल्याचे सांगितले होते.
ट्रम्प यांचा क्रुड स्वस्त करण्याचा प्रयत्न
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खनिज तेल स्वस्त होण्याची गरज व्यक्त केली आहे. खनिज तेल स्वस्त झाले तर रशिया – युक्रेन युद्ध अल्पावधीत संपुष्टात येईल असे ट्रम्प यांना वाटते. त्यामुळे सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादन करणार्या देशाच्या ओपीईसी या संघटनेने खनिज तेलाचा पुरवठा वाढवून दर कमी करावे असे आवाहन त्यांनी केले. खरे म्हणजे या अगोदरच ओपीईसीने तेल पुरवठा वाढवून तेलाचे दर कमी करण्याची गरज होती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दाओस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीला दुरस्थ पद्धतीने संबोधित करताना ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर जास्त असल्यामुळे बरेच देश रशियाकडून खनिज तेल आयात करतात आणि त्यामुळे रशियाला परकीय चलन उपलब्ध होते. त्या माध्यमातून रशियायुद्ध करत आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे पडते. युक्रेनमध्ये सध्या जे काही घडत आहेत ते तेल उत्पादक देशाच्या संघटनेमुळे घडत असल्याचेही ते म्हणाले.
हे युद्ध थांबावे यासाठी आपण इतरही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, रशियन लोक आपले शत्रू नाहीत. रशियानेच दुसरे महायुद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे दुसरे महायुद्ध थांबले. यामुळे रशियन लोकांचे भले व्हावे असेच आपल्याला वाटते. त्यामुळे युद्ध थांबण्याची गरज आहे असे ते म्हणाले. युध्दामुळे जवळजवळ 14,000 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. हे सर्व थांबण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
व्याजदरात कपातीचा प्रयत्न
अमेरिकेतील फेडरल रिझव्हनेे शक्य तितक्या लवकर व्याजदरात कपात करून अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असे ट्रम्प यांनी सुचित केले. मात्र खनिज तेलाचे दर जास्त असल्यामुळे महागाई जास्त आहे. त्यामुळे विविध देशातील रिझर्व बँकांना व्याजदरात कपात करता येत नाही. त्यामुळे खनिज तेलाचे दर कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे अमेरिकेच्या रिझर्व बँकेसह इतर देशातील रिझर्व बँका व्याजदरात कपात करतील असे ट्रम्प यांना वाटते.
सिमेंटचे दर बटाट्यापेक्षा कमी; पार्थ जिंदाल यांनी फेटाळला नितीन गडकरी यांचा आरोप
भारतातील सिमेंट कंपन्या परस्परांशी संगणमत करून म्हणजे साखळी करून सिमेंटचे दर आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर ठेवत आहेत. यामुळे पायाभूत सुविधा विकासावर परिणाम होऊन भारताच्या पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होत आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. मात्र गडकरी यांचे हे मत चुकीचे असल्याचे जेएसडब्ल्यू सिमेंट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की भारतात सिमेंटचे दर बटाट्याच्या दरापेक्षा कमी आहेत. ही परिस्थिती गेल्या दहा वर्षापासून चालू आहे असे जिंदाल यांनी सांगितले.
जिंदाल म्हणाले की, गेल्या दहा वर्षात भारतातील सिमेंटच्या किमती प्रत्येक वर्षाला केवळ एक टक्क्याने वाढल्या आहेत. इतर कोणत्याही क्षेत्रातील कंपन्या पेक्षा ही दरवाढ कितीतरी कमी आहे. प्रत्यक्षात भारतातील सिमेंटचे दर हे बटाट्यापेक्षाही कमी आहेत, हे आपल्याला दिसून येईल असे जिंदाल यांनी सांगितले. भारतात मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे सिमेंटचे दर कमी पातळीवर आहेत. याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत आहे. किंबहुना काही मोठ्या कंपन्यांना तोटा झाले असल्याच्या माहितीकडे जिंदाल यांनी लक्ष वेधले.
गडकरी यांनी हे मत आत्ताच व्यक्त केलेले नाही. तर या अगोदर गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारी 2021 मध्ये पत्र लिहिले होते. यामध्ये सिमेंट कंपन्या आवश्यकतेपेक्षा जास्त दर ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळीही सिमेंट कंपन्यांनी त्यांच्यावरील आरोपाचा इन्कार केला होता असे जिंदाल यांनी सांगितले. आता गडकरी यांनी तोच आरोप पुन्हा केला आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांनी सिमेंटसाठी पर्याय शोधण्याची गरज व्यक्त केली होती. यासाठी रीइनफोस्ड प्लास्टिकचा पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. या क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादन वाढविण्याची सूचना केली होती.
परकीय चलन साठ्याला गळती कायम
रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालय भारतातील परकीय चलन साठ्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र तरीही डॉलर वधरत असल्यामुळे आणि डॉलरची मागणी वाढल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
17 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा जवळजवळ दोन अब्ज डॉलरने कमी होऊन 624 अब्ज डॉलर या पातळीवर गेला. त्या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 8.7 डॉलरने कमी झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चलनाच्या दरात चढ-उतार झाले आहेत. त्यामुळे भारताकडील परकीय चलनाचे मूल्य कमी झाले असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर भारताची निर्यात कमी आणि आयात जास्त आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी झाला असल्याचे सांगितले जाते. दरम्यान या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. त्यामुळे भारताकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य एक अब्ज डॉलरने वाढून 69 अब्ज डॉलरवर गेले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केली होती. त्यानंतर अमेरिकेसह इतर देशातून बरीच परकीय गुंतवणूक भारतात आली. त्यामुळे परकीय चलन साठा 704.8 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला.
मात्र त्यानंतर अमेरिकेत व्याजदर कपात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी भारतातून परकीय गुंतवणूक परत जात आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्ष पदावर आल्यानंतर त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरण सुरू केले आहे. त्याचाही परिणाम भारतासह वेगाने विकसित होणार्या इतर देशाच्या परकीय चलन साठ्यावर होत असल्याचे सांगितले जाते. रिझर्व बँक आणि अर्थमंत्रालय रुपयाच्या माध्यमातून काही देशाबरोबर आयात -निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताकडील परकीय चलन साठा बराच कमी झाला असला तरी जवळजवळ एक वर्ष भारताला या आघाडीवर चिंता करण्याची गरज नसल्याचे बोलले जाते.
अमूलने देशपातळीवर दुधाच्या दरात केली कपात
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा ब्रँड असलेल्या अमूलने राष्ट्रीय पातळीवर आपल्या दुधाच्या दरात प्रति लिटरला एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र फक्त एक लिटरच्या पॅकवर ही कपात लागू करण्यात आली आहे.
इतर पॅकवर कसलीही दर कपात करण्यात आली नसल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की ग्राहकांनी एक लिटरच्या पिशव्या जास्त प्रमाणात विकत घ्यावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे दरात बदल करण्यात आलेला आहे. दिल्लीमध्ये अमूल गोल्ड मिल्क आता 67 रुपये प्रति लिटर तर अमूल ताजा दूध 55 रुपये प्रति लिटर मिळणार आहे.
दरम्यान या फेडरेशनची उलाढाल 2023-24 मध्ये आठ टक्क्यांनी वाढून 59,455 कोटी रुपये झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच आमचा महसूल 10% पेक्षा जास्त वाढेल. सध्या फेडरेशन दिवसाला सर्वसाधारणपणे 310 लाख लिटर दुधाची हाताळणी करते. तर दिवसाला पाचशे लाख लिटरची हाताळणी करण्याची आमची क्षमता आहे. या फेडरेशनला 18,600 खेड्यातील 36 लाख शेतकरी जोडलेले आहेत. फेडरेशनचे कर्मचारी दिवसाला 300 लाख लिटर दुधाचे संकलन करतात. देशांतर्गत पुरवठ्याबरोबरच हे फेडरेशन जगभरातील 50 देशांना आपल्या विविध उत्पादनाची निर्यात करते. त्यामध्ये अमेरिकेचा समावेश आहे. युरोपमध्येही लवकरच उत्पादने निर्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला 35 टक्क्यांनी
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने तिसर्या तिमाईचा ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बँकेचा नफा तब्बल 35 टक्क्यांनी वाढून 2,517 कोटी रुपये इतका झाला असल्याचे बँकेने सांगितले आहे. बँकेच्या खराब कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे बँकेला या तिमाहीत तरतूद कमी करावी लागली. यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली असल्याचे मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या या बँकेने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेला 1,870 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 18,210 कोटी रुपये झाले आह.े जे की गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये 15,318 कोटी रुपये इतके होते. कंपनीचा कार्यचलन नफा वाढून 3,703 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 3,004 कोटी रुपये इतकी होती.
बँकेची कर्ज वसुली वाढली आहे. त्यामुळे बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 3.69 टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 5.35% इतकी होती. त्याचबरोबर बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 0.85% इतकी झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 1.41% होते. बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता कमी झाल्यामुळे बँकेला खराब कर्जापोटी कमी तरतूद करावी लागली. त्यामुळे बँकेच्या नफ्यात या तिमाहित वाढ झाली असल्याचे दिसून येते. बँकेने चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे पुढील आठवड्यात बँकेच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली.
आरोग्य व बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात वाढ होत होती. मात्र बांधकाम, तेल आणि नैसर्गिक वायू आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांनी नकारात्मक ताळेबंद जाहीर केल्यानंतर शुक्रवारी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री केल्यामुळे निर्देशांकात माफक घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 329 अंकांनी कमी होऊन 76,190 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी कमी होऊन 23,092 अंकावर बंद झाला. आठवड्याच्या पातळीवरही शेअर बाजार निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले.
मेहता इक्विटी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, शेअर बाजारात कमालीचे अस्थिर वातावरण होते. वाहन. तेल आणि नैसर्गिक वायू, बांधकाम इत्यादी क्षेत्राबाबत गुंतवणूकदारात निराशावाद दिसून आला. आज रुपयाच्या मूल्यात बरीच वाढ झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी विक्री करणे पसंद केले. पुढील पंधरवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या खरेदी- विक्रीचे मोठे व्यवहार करणे टाळीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिंद्रा, झोमॅटो, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज,अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, नेसले, एअरटेल, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. मात्र त्यामुळे निर्देशांकाला फारसा आधार मिळाला नाही. डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 5,462 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
स्मॉल कॅप व मिडकॅपची जास्त हानी
छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप 2.23 टक्क्यांनी कोसळला तर मिड कॅप 1.60 टक्क्यांनी कोसळला. मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे स्मॉल कॅप आणि मिडकॅपची जास्त हानी झाली. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 2.30 टक्क्यांनी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक दोन टक्क्यांनी, वाहन क्षेत्राचा निर्देशांक दीड टक्क्याने कमी झाला. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक रुपया घसरत असल्यामुळे वाढत आहे.
सोने नव्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर
जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर आहे. त्याचबरोबर अनेक देशांदरम्यान संघर्षाचे वातावरण आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसंदर्भात काय निर्णय घेतात याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि परदेशात सोन्याची मागणी वाढून सोन्याचे दर वाढत आहेत.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 200 रुपयांनी वाढून 83,100 रुपये प्रति दहा ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. गेल्या आठ दिवसापासून सोन्याचा दर एकतर्फी वाढत आहे.
एचडीएफसी बँकेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेतील पतधोरण आणि आर्थिक धोरणाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदरात कपात करण्याची सूचना अमेरिकेच्या रिझर्व बँकेला केली आहे. त्याचबरोबर ते व्याजदरात कपात करणार आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदार सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. चांदीसाठी गुंतवणूकदाराबरोबरच औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी चांदीचा दर पाचशे रुपयांनी वाढून 94 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
देशातील आणि परदेशातील वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर नव्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्पॉट मार्केटमध्येही या दोन धातूचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर 0.56 टक्क्यांनी वाढून 2,780 डॉलर व चांदीचा दर 1.53 टक्क्यांनी वाढून 31.32 प्रति औंस या पातळीवर गेला. आगामी काळात गुंतवणूकदार भारताच्या अर्थसंकल्पाकडे आणि अमेरिकेच्या पतधोरणाकडे लक्ष देणार असल्याचे एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले.
ओला आणि उबरला नोटिसा
अॅन्ड्रॉइड आणि आयफोनच्या प्रवाशांना इतरांपेक्षा वेगळं भाडं आकारण्याबद्दल केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं ओला आणि उबरवर नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नोटीस बजावण्यात आली असून त्याबद्दल ऑनलाईन प्रतिसाद मागवल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं.
सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगानं व्हॉटस अॅपवर आणलेली बंदी एनसीएलएटी अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने अंशत: स्थगित केली आहे. एनसीएलएटी पीठाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हे निर्देश दिले. भारतात 50 कोटी व्हॉट्स अॅपग्राहक असून त्यावर बंदीमुळे हा व्यवसाय विस्कळीत होईल, असं त्यांनी निर्देशात म्हटलं आहे.
सीसीआयने व्हॉट्स अॅपवर डेटा शेअरिंग पद्धतींबद्दल पाच वर्षांची बंदी घातली होती. पुढच्या उपाययोजनांची चाचपणी मेटा करेल आणि लाखो व्यवसायिकांच्या व्हॉट्स अॅपकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करेल असं मेटानं निवेदनात म्हटलं आहे. सीसीआयनं ठोठावलेल्या 213 कोटी रूपयांच्या दंडाच्या निम्मी रक्कम मेटानं जमा करावी असे निर्देशही न्यायाधिकरणाने दिले आहेत.