Ecole T20 Cup 2024 (Pune) – केदार बजाजने केलेल्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाला १ गडी राखून पराभूत करतना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
शिंदे हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत, अष्टपैलू संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. अमित राठोडने फटकेबाजी करताना ३६ चेंडूत ३ चौकार व ६ षटकारांच्या सहायाने ६१ धावांची खेळी केली. त्याला अश्कन काझीने ३० (१ चौकार, १ षटकार), हर्ष संघवीने २२ (३ चौकार, १ षटकार) धावा करताना सुरेख साथ दिली. ओंकार राजपूतने ३ तर केदार बजाज, निमिर जोशी, साव्या गजराज, निलय नेवासकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
केदार बजाजने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने २० षटकांत ९ बाद १६५ धावा करताना विजय साकारला. केदार बजाजने १० चेंडूत नाबाद ३३ धावा करताना ४ षटकार मारताना संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. स्नेहल खामणकरने सर्वाधिक ४० (४ चौकार, ३ षटकार), ओंकार राजपूतने २२ (१ चौकार), मेहुल पटेल २१ (२ चौकार), निलय नेवासकर १८ (१ षटकार) धावांचे योगदान दिले. अमित राठोडने ४, दीपक डांगी व अश्कान काझी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सामनावीर पुरस्काराने केदार बजाजला सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्तम फलंदाज अष्टपैलू स्पोर्ट्सच्या सागर पवारला, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अष्टपैलू स्पोर्ट्सच्या दीपक डांगीला तर मालिकावीर म्हणून राजस्थान रॉयल्स अकादमीच्या साव्या गजराजला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष दर्शन जिंदाल, सचिव व स्पर्धा संचालक सयन सेनगुप्ता, संचालक महेश देशमुख व संचालक अंशुल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.