पुणे – स्नेहल खामणकरने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने मेव्हिरिक्स अकादमी संघाला ६ गडी राखून पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
शिंदे हायस्कूलच्या मैदनावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेव्हिरिक्स संघाने रणजीत निकमच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ९ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारली. रणजीत निकमने ३६ चेंडूत ३ चौकार व ६ षटकार मारताना ७४ धावांची खेळी केली. अनिश गायकवाडने २७ (१ चौकार, ३ षटकार) तर शुभम तैस्वालने १६ (१ षटकार) यांनी रणजीतला साथ देण्याचा प्रयत्न केला. निमिर जोशी व केदार बजाज यांनी प्रत्येकी २ तर ओंकार राजपूतने १ गडी बाद केला.
स्नेहल खामणकरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने १७.१ शतकांत ४ बाद १५१ धावा करताना विजय साकारला. स्नेहल खामणकरने ३ चौकार व ५ षटकार लगावताना ५० धावांची खेळी केली. त्यानंतर वेदांत पाटीलने नाबाद ३८ (५ चौकार, १ षटकार) तर साव्या गजराजने नाबाद १८ (२ चौकार, १ षटकार) धावांची खेळी करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हरी सावंतने २ तर अक्षय वायकर व संज्योत सुतार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. स्नेहल खामणकरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंतिम फेरी : राजस्थान रॉयल्स अकादमी वि. अष्टपैलू स्पोर्ट्स