पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आत्तापासूनच तयारी हवी

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीकारांना प्रतिबंध आवश्‍यक : विसर्जन तळ्याचा प्रश्‍न सुटणे गरजेचे

सातारा – गणेशोत्सवाला अद्याप चार महिने बाकी असले तरी आतापासूनच उत्सवाच्या तयारीला सुरूवात होणार आहे. विशेषत: मुर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. अशावेळी यंदाचा गणेशात्सव पर्यावरणपूरक व्हावा, या दृष्टीने प्रशासनाने आतापासूनचच पाऊले उचलणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी शाडूच्याच मुर्तीच बनविण्यासाठी प्रशासनाने मुर्तीकारांशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बहुचर्चित साताऱ्यातील विसर्जन तळ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी व पालिकेने पाऊले उचलयाला हवीत, अशी प्रतिक्रिया सूजाण नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा उत्सव अशी गणेशोत्सवाची ओळख निर्माण झालेली आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत सांगितले जाते. मात्र, आता गणेशात्सवाला चार महिने अवधी बाकी आहे. तेव्हा पर्यावरणपूरक मुर्तीच तयार व्हाव्यात यासाठी प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुर्तीकारांनी देखील केवळ व्यवसायिकता न पाहता आपण निसर्गाचे काही देणे लागतो, असे आत्मचिंतन करून शाडूच्या मुर्ती बनविणे आवश्‍यक आहे. नागरिकांमध्ये देखील चांगल्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे.मागील काही वर्षापासून शाडूच्या मुर्ती घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशात्सवात मुर्तीकारांनी अधिकाधिक शाडूच्या मुर्ती बनविल्या तर खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार आहे.

त्याचप्रमाणे सातारा शहरात दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तळ्यांचा विषय ऐनवेळी चर्चेला घेण्यात येतो. शहरातील नैसर्गिक तळ्यांमध्ये विसर्जन करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून विसर्जन जिल्हा परिषदेच्या शेती फार्ममधील कृत्रित तळ्यामध्ये करण्यात येते. पालिकेच्यावतीने कृत्रिम तळे तयार करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी पालिकेचे लाखो रूपये खर्च केले जात आहेत. अशावेळी पालिकेने स्वत:च्या मालकीचे कायम स्वरूपी विसर्जन तळे तयार करावे, अशी मागणी मागील वर्षी करण्यात आली. एवढेच नव्हे तर मागील वर्षी विसर्जनाचा प्रश्‍न ताणला गेल्यानंतर ऐनवेळी जिल्हा परिषदेच्या शेती फार्ममध्ये तळे करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला होता. यंदाच्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा विसर्जन तळ्याचा प्रश्‍न निर्माण होवू नये, यासाठी विशेषत: नगरसेवकांनी अत्तापासून तयारीला लागणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.