ग्रहण

कभी कभी गलतियॉं करना भी अच्छा होता है… जन्माला आल्यानंतर शाळेत जाईपर्यंतच्या आयुष्याचा एक टप्पा असतो. बालपण सुदैवी असेल, तर तो काळ अखंड पिकनिक असतो. नसेल तर… जाऊ दे. आपण त्या गल्लीत नकोच शिरायला.

पहिली हा पूर्ण वेळ शाळेचा दुसरा टप्पा. सरळ मार्गाने गेलो तर, पुढची दहा वर्षे हा घडण्याचा काळ. इथे फाटे फुटले तर एखाददोन वर्षं इकडे तिकडे जास्तीची लागू शकतात. या चार भिंतीत तुम्ही घडता. घराइतकाच ठाम ठसा, शाळा उमटवते. शाळा संपेस्तोवर तुमच्या “असण्याची’ दिशा ठरते. आपलं आपल्याला जाणवेलच असं नाही, पण पुढे जाऊन मागे वळून पाहिलं, की समजतं इथवर पोचलो त्याच्या सुरुवातीची मुळं शाळेत नेमकी कुठे, कधी व कशी रुजली ते.
मग येतं ते दहावी नावाचं भोकाड वर्ष. बेकार… कुणी एक घास गिळू देत नाही सुखानं. मला तर वाटायचं की एखादा श्‍वास जास्तीचा घेतला तरी कुणी ओरडेल, क्काय खुशाल हवा ओढतेस? धाव्वी ना तुझी? मग अभ्यास करायचा सोडून हे काय चालवलंय? सरावाच्या अतिरेकाचा अतिरेक होऊन ती बोर्डाची परीक्षा एकदाची सुरू होते.

अठरा अक्षोहिणी बाजार बुणगे आणि काही निवडक एकशे पाच युद्धात उतरतात. परीक्षा सेंटर नावाचं कुरुक्षेत्र आ वासून घास घ्यायला रेडीच असतं. रोजचा दिवस धर्मयुद्धाचा. शेवटचा एक अधर्मयुद्धाचा. ही त्याचीच आठवण.
गणित, भूमिती आणि भौतिकशास्त्र सोडून सगळे विषय माझ्या आवडीचे होते. म्हणजे ज्यात मला काही समजायचं. आ वासून मठ्ठ भोकऱ्या नजरेनं फळ्याकडे बघत बसण्याची लाजिरवाणी वेळ यायची नाही. इतिहास, भूगोल आवडायचे कारण, बहुतेक सावंत बाई उत्तम शिकवायच्या, म्हणून.

भूगोलातली ही ग्रहणाची आकृती काढायला सोपी होती. शास्त्र व भूगोल यात आकृत्यांचे पैकीच्या पैकी मार्कं मिळायचे. अक्कल न वापरता टक्के वाढवण्याची केव्हढी ही सोय! यासाठी मी कंपासपेटीत एक रुपया, आठ आणे व चाराण्याचं नाणं ठेवायचे. मोठा सूर्य, मधली पृथ्वी आणि चंद्र चाराणे. दहावीच्या परीक्षेतला शेवटचा पेपर भूगोलाचा होता. परीक्षा संपत आल्यानं वातावरण एकदम आनंदी, उत्साही आणि मोकळं झालं होतं. परीक्षक खुल्या दिलानं वर्गाबाहेर जाऊन उभे होते. माझ्या पलीकडे एक मुलगी होती. कॉर्पोरेशनच्या शाळेतली. उंच, वर वेण्या घातलेली, जुना युनिफॉर्म आणि रबरी स्लीपरवाली. चित्रं पुरेसं बोलकं आणि ओळखीचं होतं. आजुबाजूला बहुतेक तीच स्थिती होती. कुणी दगड कुणी वीट, इतकंच.

हिची अवस्था पहिल्या पेपरपासूनच, “काय मी लिहू? कुणाला विचारू?’ अशी होती. पहिले सगळे पेपर काही तिला जमलं नाही, पण शेवटच्या दिवशी मात्र ती फारच रडकुंडीला आलेली दिसली. मी सुपरवायझरकडे आशेनं बघितलं. त्यानी फक्त मान हलवली. मी तिला झटपट कंपासमधून नाणी काढून दिली आणि पेपर तिरका ठेवला. पूर्ण पाच मार्कांसाठी ही सूर्यग्रहणाची आकृती काढायला आली होती. तिने भराभर आकृती काढली. नावं दिली. माझी नाणी आठवणीनं परत दिली. मग मात्र मी खुशाल गाळलेल्या जागा, जोड्या लावा असले सगळे छोटे प्रश्‍न तिला दाखवले. तिचं लिहून होताच दोनेक मिनिटात वेळ संपली. घंटा वाजली. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद होता! पासिंग पुरते नक्की सुटले होते. गोड हसून थॅंक्‍यू, म्हणाली आणि गर्दीत कुठेतरी हरवून गेली. कॉपी करणं ही चूक किंवा गुन्हाच खरं तर. पण यावेळी कुणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं. ही ग्रहणाची आकृती दिसली की ते सुटलेलं ग्रहण आठवतं. तभी कहूँ हूँ के कभी कभी गलतियॉं करना भी अच्छा होता है!

सुचरिता

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.