वाई तालुक्‍यातील डोंगरांना वणव्याचे ग्रहण

अनिल काटे
वाई – वाई तालुक्‍यातील पूर्व व पश्‍चिम भागातील खासगी मालकीसह वन विभागाच्या डोंगरांना जाणीवपूर्वक वणवे लावण्याची मालिका यावर्षी डिसेंबरमध्येच सुरू झाल्याने डोंगरालगतची वाई वन विभागाची संरक्षित सर्व जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडून वन्यजीवांसह अनमोल वनसंपदा जळून खाक होत आहे. विविध प्रकारच्या वनराईने नटलेल्या वाईतील सह्याद्रीच्या डोंगररांगांना वणव्याचे ग्रहण लागल्याने आग लावणाऱ्या अपप्रवृत्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व जनतेकडून केली जात आहे.

खासगी मालकीसह वन विभागाच्या डोंगराना वणवे लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जंगलांना लागलेल्या या आगीमुळे संरक्षित वनक्षेत्रास फटका बसत आहे. वणवे लावून वनसंपदा नष्ट करणाऱ्या अपप्रवृत्तीना शोधून वाई वन विभाग गुन्हे दाखल करण्यात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. तरीही याचा परिणाम संबंधित लोकांवर होत नसल्याने दरवर्षी वणवे वाढताना दिसत आहेत, याची खंत वाई वन कर्मचारी व्यक्त करत आहेत. वाई तालुक्‍यातील डोंगरक्षेत्र मोठ्या प्रमाणात खासगी मालकीचे असून डोंगर जमीन जाळल्यावर पुढील वर्षी चांगले गवत उगवते, या गैरसमजातून डोंगरांना सर्रास वणवे लावले जात आहेत.

अगोदरच वन हद्दीतील वृक्षांची चोरून बेसुमार कत्तल केली जात असल्याने बहुतांशी डोंगर बोडके होत चालले आहेत. या बोडक्‍या डोंगरावर नव्याने झाडे लावण्याऐवजी वन विभागाने मेहनत घेऊन जोपासलेली वनसंपदा वणवे लावून भस्मसात करण्याचे काम समाजातील काही वाईट प्रवृत्ती करत आहेत. अशा समाजकंटकांना कायमचा पायबंद घालण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने स्थानिकांनी तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

डोंगरांना दररोज लागणाऱ्या आगीमुळे संरक्षित जंगलातील लाखमोलाची वनसंपदा वाचवण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारीवर्गाची दमछाक होत आहे. भडकलेल्या रौद्ररूपी आगीला विझवताना अनेकदा आगीचे चटके सहन करत दुखापतीच सामना करावा लागत आहे. कित्येकदा वाऱ्याचा जोर असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कपडे पेटून दुर्घटना घडत आहेत. याला जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वन कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सहकार्याने मेहनत घेऊन उभी केलेली जंगले, लहानमोठे वन्यजीव, औषधी वनस्पती व महाकाय वृक्ष आगीमुळे क्षणार्धात जळून भस्मसात होत आहेत. याचे कसलेही सोयरसुतक समाजविघातक प्रवृत्तीना नसल्याने राज्य शासनाचे लाखो रुपये अक्षरशः पाण्यात वाहून जात आहेत. डोंगराना मुद्दाम आगी लावून वनसंपदा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या खासगी डोंगरमालकांवर कारवाई करुन दरवर्षी निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी खासगी मालकीचे क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व वाई वन विभागाकडून शासनाकडे केली जात आहे.

वनसंपदेचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून डोंगराना आगी लावून वन्यजीव व वनसंपदा नष्ट करणे म्हणजे एकप्रकारे निसर्गाचा समतोल ढासळून पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मानवी जीवन धोक्‍यात येत आहे. ही बाब गंभीर असल्यामुळे यापुढे वनांना वणवे लावणाऱ्या व्यक्तींना शोधून वाई वन विभाग कडक कारवाई करणार आहे.
– महेश झांजुरने  , (वनपरिक्षेत्र अधिकारी, वाई)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.