अकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

कराड शहरातील अवस्था; उपाययोजना करण्याची मागणी

कराडकरांची ठेकेदाराकडून बोळवण
गतवर्षीच्या पावसाळ्यात दत्त चौक ते पाटण कॉलनी या मुख्य रस्त्यावर नवीन रस्त्याचा वरील थर पहिल्याच पावसात निघून गेला. येथील खडी रस्त्यावर आली. यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले. जनतेने याबाबत उठाव केल्यानंतर पालिकेला जाग आली. आणि पालिकेने ठेकेदाराकडून या रस्त्यावर कायमस्वरूपी दुरुस्ती न करून घेता येथे पॅच मारून कराडकर यांची बोळवण केली.

कराड – अकरा कोटी रुपये खर्चून वर्षभरापूर्वी केलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर आजमितीला खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील खडीचा थर निघून गेल्यामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एखदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या रस्त्याची अक्षरश: वाट लागली असून 11 कोटी रुपयांचा चुराडा होण्याची शक्‍यता आहे. टाऊन हॉल ते कृष्णा नाका व कृष्णा नाक्‍यापासून शिवाजी हायस्कूलपर्यंत हा मुख्य रस्ता म्हणजे नवीन आहे.

यावर वाहनधारकांचा विश्वासच बसेनासा झालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व राज्याचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 100 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला होता. त्यामध्ये कराडमध्ये देखील विविध विकासकामांबरोबरच मुख्य रस्त्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. निधी मंजूर झाल्यानंतर रस्त्याचे काम झाले. मात्र गतवर्षीच्या पहिल्याच पावसात या रस्त्याची वाट लागली. तीच अवस्था आत्ताच्या पावसाळ्यात सुध्दा तशीच झालेली पहावयास मिळत आहे.


या निधीतून तयार करण्यात आलेला हा रस्ता वर्षभरात खचला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. जुन्या रस्त्यावरच मुलामा दिल्याने वरच्या मुलाम्याचा थर निघून रस्त्यावर ठिकठिकाणी पॅचअप लावल्याने रस्त्याचा दर्जा पूर्णपणे ढासळला आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य रस्त्यासाठी हा निधी मंजूर झाला. मार्च 2016 मध्ये कामाचा आदेश निघालेल्या व प्रत्यक्षात वर्षभरानंतर सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामाला एक वर्षाची मुदत देण्यात आली.
कोल्हापूर नाक्‍यापासूनच रस्ता जागोजागी खचलेला आहे त्यामुळे रस्त्याचे दर्जाहीन काम नजरेत भरत आहे. नवीन रस्ता तयार करताना तो रस्ता पूर्णपणे न उकरता त्यावरच वाळू, खडी टाकून कॉंक्रिटीकरण केले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने वर्षभरातच वरच्या रस्त्याचा थर निघून जुना रस्ता वर आला आहे. त्यामुळे रस्ता व्हायच्या आधी जी स्थिती होती, तीच आता हळूहळू पहावयास मिळत आहे

शिवाजी हायस्कूल ते स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय या दरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी खचल्याने याठिकाणी अनेक वाहनधारक, पादचारी पडून जखमी होत आहेत. रस्त्यावर सर्वत्र खडी निघाल्याने वाहनधारक खडीवरून घसरत आहेत. त्यामुळे ही रस्त्यावरील खडी वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. याबरोबरच 24 बाय 7 योजनेसाठी उकरण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याचा दर्जा लक्षात आल्यावर रस्ता पूर्णपणे उखडून काढून पुन्हा नव्याने करणे गरजेचे होते. मात्र खचला रस्ता की मार ठिगळं हाच फंडा ठेकेदारांकडून चालवल्याचे चित्र दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)