सातारा – सर्व आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत असून आता जिल्ह्यातील सर्व 72 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इसीजी मशीन बसवण्यात येणार आहेत.
आरोग्य समितीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडू लागले असल्याने आरोग्य विभागाने तात्काळ गावोगावी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याचे विधाते यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची मासिक सभा प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. सभेस डॉ. अभय तावरे, राजेश पवार, राजाराम शेलार, राजाभाऊ जगदाळे, भाग्यश्री मोहिते, शारदा ननावरे, उषादेवी गावडे, डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रूग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात, या रूग्णांचे तात्काळ निदान होण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ईसीजी मशिन मिळावे, अशी मागणी डॉ. अभय तावरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ईसीजी मशिन घेण्यात येणार असल्याचे विधाते यांनी सांगितले.
जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण सापडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावोगावी “घर टू घर’ सर्व्हे करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार विधाते यांनी सर्व्हे करून नागरिकांना योग्य औषधोपचार करण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला शासनाकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे.
ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करावी तसेच लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे विधाते यांनी सांगितले.करोनाबाधित रूग्ण, लसीकरण मोहीम, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
मंजूर कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावा ः प्रदीप विधाते
बांधकाम समितीची सभा प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस बापूराव जाधव, धैर्यशील अनपट, सागर शिवदास, मनोज पवार, अर्चना रांजणे, बाबासाहेब पवार, संगीता मस्कर, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे, बांधकाम दक्षिणचे कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. बांधकाम विभागातील 2020-21 मधील मंजूर कामांची टेंडर प्रक्रिया करून ही कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना विधाते यांनी दिल्या. 2021-22 मध्ये जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावण्यासाठी कामांना गती देण्यासंदर्भात सदस्यांनी सूचना मांडल्या. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.