Ebola Alert : काँगो आणि इतर संबंधित देशांमधील इबोलाच्या साथीशी संबंधित बदलती परिस्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसींनुसार भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या देशांमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ असल्याचे जाहीर केले आहे. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेसुद्धा काँगो आणि युगांडावर परिणाम करणाऱ्या बुंदिबुग्यो प्रजाती इबोला विषाणू आजाराच्या सध्याच्या उद्रेकाला खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणीबाणी समितीने देशातील प्रवेशाच्या ठिकाणी रोगावर देखरेख मजबूत करण्यासाठी तात्पुरत्या शिफारशी जारी केल्या आहेत.