सातारा – माजी खासदार व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्या जयंतीनिमित्त खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली; परंतु ही भेट केवळ घरगुती स्वरूपाची होती, असे उदयनराजेंच्या गोटातून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांचा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा कायम होता. त्यांच्या शब्दाला राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये कायमच मान होता. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्ष्मणतात्यांची उणीव भासत आहे. अशा स्थितीत त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे विकासनगर (संगमनगर) येथील निवासस्थानी भेट दिली.
उदयनराजेंनी लक्ष्मणतात्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तात्यांच्या पत्नी सुमनकाकी यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. निमित्त तात्यांच्या जयंतीचे असले, तरी उदयनराजेंच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली; परंतु ही भेट निव्वळ घरगुती स्वरूपाची असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. उदयनराजे यांची अनेक नेत्यांशी पक्षविरहीत मैत्री आहे. स्वतःच्या वाढदिवसाला साताऱ्यात न आलेले उदयनराजे लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीला साताऱ्यात येऊन त्यांच्या घरी गेले. त्यातून उदयनराजेंचे वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध झाले.