टोल वसुली बंद करण्यासाठी खा. लोखंडेंचे आंदोलन

राहाता – अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी, या करीता शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच नगर-मनमाड महामार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त झाल्यापर्यंत टोल वसूल करू नये, यासाठी पिप्रीनिर्मळ येथील टोल वसुली बंद करत नाक्‍याला टाळे ठोकण्यात आले.

खा. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राहाता तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोरवर धरत शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांना शेतकऱ्यांच्या खळ्यावरील पिकांचे, शेतातील पिकांचे, फळबाग, चारा पिके यासह सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी करत निवेदन दिले.

त्यानंतर खा. लोखंडे यांनी जागतिक बॅंकेचे प्रकल्प उपअभियंता ए. जी. मेहत्रे यांना नगर-मनमाड रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असूनही पिप्री निर्मळ येथील टोलनाक्‍या टोल आकारला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाही, तोपर्यंत टोल आकारणी बंद करावी, अशी मागणी केली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांसह नगर-मनमाड महामार्गावरील पिंप्री निर्मळ येथील टोलनाका गाठला.

तसेच टोलवसुली बंद करत टोल नाक्‍याला टाळे ठोकले. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत टोल वसुली करू नये. अन्यथा शिवसेना आमच्या पद्धतीने हा टोलनाका बंद करेल, असा इशारा दिला. वेळी शिवसेनेचे कमलाकर कोते, प्रमोद लबडे, संजय शिंदे, राजेंद्र पठारे, अनिल बागर, धनंजय गाडेकर, पुडंलिक बावके, सचिन कोते, दिनेश आरणे, भास्कर मोरकर, गणेश सोमवंशी, राजेंद्र देवकर, चेतन साबदे, अमोल गायके, ज्ञानदेव पवार, रमेश वाघ, बालाजी गोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.