संगमनेर – आचारसंहितेचे उल्लंघन करत विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आला आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथे गुरुवारी खा. लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तेथे सभा घेण्यात आली. या सभेत खा. लोखंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका देखील केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या सभेसंबंधिचे मेसेज व्हॉटस्अपवरुन कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यत पोहोचली. त्यामुळे त्यांनी या सभेचे चित्रीकरण करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते.
सभेची कोणतीच परवानगी त्यांच्याकडून घेतली गेली नव्हती. तसेच पोलिसांकडून अशी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळताच संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अकोले यांनी रात्री उशिराने दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यत घारगाव (संगमनेर) पोलिस ठाण्यात भरारी पथकातील अधिकारी पी. एन. वाकचौरे यांच्या तक्रारीवरुन कोणतीही परवानगी न घेता जनसमुदाय जमवून सभा घेऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.