फलटण – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नुकतीच आसू (ता. फलटण) येथे भेट देऊन दिवंगत नेते दादाराजे खर्डेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक व माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे नुकतेच निधन झाले. खा. शरद पवार यांनी आसू येथे खर्डेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. दादाराजे यांचे सुपुत्र व पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर व कुटुंबीयांचे सांत्वन केले. दादाराजे खर्डेकर यांच्याशी आपले वैयक्तिक व घरगुती संबंध होते.
मलाच ते पक्ष म्हणून मानत. त्यांनी नेहमीच मला साथ दिली. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या दादाराजे खर्डेकर यांनी उत्तम काम करून जिल्हा बॅंकेचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची हानी झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही खा. पवार यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही खर्डेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.