खा. रणजितसिंहांचा अधिकाऱ्यांना इशारा

कामात सुधारणा न झाल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा

खटाव – माण तालुक्‍यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. प्रशासन मात्र टॅंकर खेपा आणि चारा छावण्या मंजूर करण्यास टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत दुष्काळ निवारण्याच्या कामात सुधारणा करावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिला. खासदार झाल्यानंतरच्या पहिल्याच दुष्काळी दौऱ्यात त्यांनी दहा लाखांचे पशुखाद्य आणि जलसंधारण कामांसाठी रोख आर्थिक मदतीचे वाटप केले.

माण आणि खटाव तालुक्‍यात दुष्काळ निवारणासाठी दोन कोटींचा निधीही त्यांनी जाहीर केला. माण तालुक्‍यातील विविध चारा छावण्या आणि वॉटरकप स्पर्धेअंतर्गत सुरू असणाऱ्या जलसंधारण कामांना भेटी दिल्यानंतर शेवरी येथील चारा छावणीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. जयकुमार गोरे, प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार बी. एस. माने, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, अर्जुनतात्या काळे, जि. प. सदस्य अरुण गोरे, सोमनाथ भोसले, संजय भोसले, सिद्धार्थ गुंडगे, अतुल जाधव, गोविंदराव शिंदे, दिलीपभाऊ जाधव, जयकुमार शिंदे, अनुप शहा, धनाजी जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. निंबाळकर म्हणाले, दुष्काळी जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना अधिकारी त्यांच्या कामात कुचराई करत आहेत. रेकॉर्डवर बोगस टॅंकर खेपा दाखवल्या जात आहेत. अनेक गावांनी मागणी करुनही टॅंकर आणि छावण्या मंजूर करण्यात चालढकल केली जात आहे. आठ दिवसांत अधिकाऱ्यांनी कारभार सुधारावा अन्यथा होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल. मागेल त्या ठिकाणी चारा छावणी आणि टॅंकर दिले जावेत.

टॅंकरच्या शंभर टक्के मंजूर खेपा केल्या जाव्यात. 50 छावण्यांमध्ये 40 हजार जनावरे आहेत. त्यांच्या चारा, पाण्याचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका आणि निष्क्रिय कारभार करून त्यांच्या जखमेवर मीठही चोळू नका, असे अवाहन त्यांनी केले. माण खटाव मतदासंघाने माझ्या विजयात मोठी भूमिका निभावली आहे. या मातीचे ऋण विसरता येणार नाहीत. या भागात पुन्हा दुष्काळ पडू नये, चारा छावण्या सुरू कराव्या लागू नयेत म्हणून येणाऱ्या पाच वर्षांत भरीव काम करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना दुरुस्त करण्याचे प्रस्ताव द्या, बॅंकांनी दुष्काळात कर्जवसुलीची सक्ती करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. आ. जयकुमार गोरे म्हणाले, खासदारांनी माण आणि खटावचा दूत म्हणून काम करावे. या भागात पाणीपातळी चारशे फुटांच्या खाली गेली आहे. दुष्काळ “आ’ वासून दरवर्षी उभा राहत आहे. जनतेचे पाण्याविना हाल होत आहेत. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. टॅंकरच्या 50 ते 60 टक्केच खेपा होत आहेत मात्र, रेकॉर्डवर त्या 100 टक्के दाखवल्या जात आहेत. मागणी करणाऱ्या गावांना टॅंकर आणि चारा छावण्या मंजूर केल्या जात नाहीत. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे केली नाहीत तर गाठ माझ्याशी आहे हे ध्यानात ठेवावे.

अधिवेशनात याबाबतीत आवाज उठवून अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा त्यांनी दिला. आंधळी धरणार लवकरच जिहेकठापूरचे पाणी येणार आहे. उत्तर भागातील 35 गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी 300 कोटींचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. खासदारांनी आमचे धोम बलकवडीचे पाणी आम्हाला द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माझी लढाई दुष्काळी मातीसाठी आणि इथल्या स्वाभिमानी जनतेसाठी आहे. ही माती लढायला आणि जगायला शिवकते. या मातीचा दुष्काळ हटविल्याशिवाय हा जयकुमार स्वस्थ बसणार नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here