मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले

जिल्हाध्यक्षांकडून भाषण रोखण्याचा प्रयत्न

नगर – नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सभेच्या वेळी खासदार दिलीप गांधी चांगलेच भडकले. मोदी सभास्थळी येण्यापूर्वी खा. गांधी यांनी भाषण करण्यास सुरूवात केली. परंतू एक मिनिट आटोपताच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी खा. गांधी यांचे भाषण रोखले. त्यामुळे खा. गांधी चिडले. मी अजून बोलणार आहे. मला दोन मिनिटे तरी बोलू द्या. नाही मी थांबतो. यावरून व्यासपीठावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वी राज्यपातळीवरील व स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. त्यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यापूर्वी खा. गांधी यांना बोलण्याची संधी देण्यात आली. डॉ. विखे यांनी खा. गांधी यांना बोलण्याचा आग्रह धरला. त्यानुसार खा. गांधी यांनी भाषण सुरू केले. खा. गांधी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी थांबण्याची सुचना केल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला. विखेंच्या प्रवेशामुळे देशात वेगळा संदेश गेला आहे. असे सांगून खा. गांधी यांनी विकासकामांची माहिती देत असतांना प्रा. बेरड यांनी खा. गांधी यांना भाषण थांबविण्यास सांगितले. त्यानंतर खा. गांधी चांगलेच चिडले. मला बोलू द्या, दोन मिनिटे देखील झाली नाहीत.

मी दहा मिनिटे बोलणार आहे, तुम्ही बोलून देणार नसेला तर मी चलो असे म्हणून खा. गांधी निघून चालले होते. परंतू डॉ. विखे यांनी सर तुम्ही बोला असे म्हणून खा.गांधी यांना पुन्हा भाषण सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर खा. गांधी भावुक झाले होते. कोण म्हणते विकास कामे झाली नाही. मी केलेल्या कामांचे गबाड घेवून आलो आहे. विकास कामांचा लेखाजोखा सोबत आहे. हे बोलतांना खा. गांधी यांचे डोळे पाणावले होते. भावुक होवून त्यांनी खडे बोल सुनावल्याने बेरड व्यासपीठावरून काहीसे बाजूला गेले होते. खा. गांधी यांनी भाषण आटोपते घेतल्यानंतर त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्‍त केली. त्यावेळी वाद वाढायला नका म्हणून डॉ. विखे यांनी खा. गांधी यांची समजूत काढत त्यांना त्यांच्या जागेवर बसविले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.