पूर्व चंपारण्य केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात….

महात्मा गांधींच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या कर्मभूमीवर वर्षभर सातत्याने राजकीय आणि सामाजिक घडामोडी सुरू असतात. यावेळी पूर्व चंपारण्य लोकसभा मतदारसंघ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाने राधामोहन यांना नवव्यांदा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महागठबंधनतर्फे रालोसपाचे युवा नेते आकाश कुमार सिंह मैदानात उतरले आहेत. आकाश हे केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद यांचे सुपुत्र आहेत. एनडीए आणि महागठबंधन या निवडणुकीतील समीकरणांबरोबरच राधामोहन आणि आकाश यांना जातीय आधारही आहेत. 2004 मध्ये अखिलेश प्रसाद सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरून मोतिहारी मतदारसंघातून राधामोहन यांचा पराभव केला होता. अखिलेश 2009 मध्येही राधामोहन यांच्याविरुद्ध लढले होते; परंतु त्यांचा पराभव झाला होता.

गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाने या जागेवर आपली मजबूत पकड ठेवली आहे. 1989 पासून आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाच वेळा भाजपातर्फे राधामोहन सिंह यांनी या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. दोन वेळा राजद आणि एकदा माकपाच्या उमेदवारांनी इथे विजय मिळवला. सीपीआयने यंदा प्रभाकर जयस्वाल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. प्रभाकर हे गाजलेले फुटबॉलपटू आहेत. 2005 पासून ते पूर्व चंपारण्याच्या फुटबॉल संघाचे सचिव आहेत. आतापर्यंतच्या सोळा लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी पाच वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 1952 ते 1971 या काळात येथून विभुती मिश्र हे कॉंग्रेसचे उमेदवार सातत्याने विजयी होत आले. 1977 मध्ये आणीबाणीमुळे कॉंग्रेसची विजयाची परंपरा खंडित झाली. 1984 मध्ये कॉंग्रेसच्या प्रभावती गुप्तांचा विजय झाला. त्यानंतर मात्र कॉंग्रेसला मतदारांनी जो “हात’ दाखवला, तो आजपर्यंत कायम राहिला. या मतदारसंघात 7.25 कुशवाह, 0.8 टक्‍के ब्राह्मण, 10.15 यादव, 14 टक्‍के मुस्लीम, 6.5 टक्‍के भूमीहीन, 5.75 टक्‍के राजपूत, 0.7 टक्‍के तेली अशी जातीय विभागणी आहे. पूर्व चंपारण्य लोकसभा मतदारसंघांतर्गत मोतिहारी, हरसिद्धी, गोवंदगंज, केसरिया, कल्याणपूर आणि पिपरा हे विधानसभा मतदारसंघ येतात.

2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोतिहारी सदर, कल्याणपूर आणि पिपरा या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाने, तर गोविंदगंज विधानसभा मतदारसंघातून लोजपाने विजय मिळवला. हरसिद्धी आणि केसरिया या दोन विधानभा मतदारसंघात राजदचा वरचष्मा राहिला. 1967 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या राधामोहन सिंह यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात चांगला संपर्क ठेवलेला आहे. 1998 मध्ये राधामोहन सिंह हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मोतिहारी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. 2006 मध्ये राधामोहन यांना बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. त्यांना मानणारा वर्गही इथे मोठा आहे. या मतदारसंघाने आतापर्यंत देशाला दोन कृषिमंत्री दिले आहेत. मागील काळात अखिलेश प्रसाद सिंह यांनी राजदकडून इथून विजय मिळवला होता तेव्हा त्यांना मनमोहनसिंह सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री बनवण्यात आले होते. राधामोहन सिंह यांच्याविरोधातील उमेदवार 26 वर्षे वयाचे आकाश कुमार सिंह हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत. हा नवखा तरुण राजकारणात मुरलेल्या राधामोहन सिंहांचे आव्हान कसे पेलणार हे पहावे लागेल.

ठळक बाबी…
– या मतदारसंघात एकूण 16,31,187 मतदार आहेत.
– यामध्ये 8,71,576 पुरुष मतदार, तर 7,59,582 महिला मतदार आहेत.
– पूर्व चंपारण्यमध्ये सहाव्या टप्प्यात म्हणजे 12 मे रोजी मतदान होणार आहे.
– 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधामोहन सिंह यांना 4,00,452 (48.68 टक्‍के) मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजदचे विनोदकुमार श्रीवास्तव यांना 2,08,289 (25.23 टक्‍के) आणि जदयुच्या अवनीशकुमार सिंह यांना 1,28,605 (15.63 टक्‍के) मते मिळाली होती.
– 2009 मध्ये राधामोहन सिंहांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना 2,01,114 (41.74 टक्‍के) मते मिळाली होती; तर अखिलेश प्रसाद यांना 1,21,824 (25. 28) आणि कॉंग्रेसच्या अरविंद कुमार गुप्ता यांना 68,323 (14.28 टक्‍के) मते मिळाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.