नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होते. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने ही माहिती दिली आहे. नेपाळमधील भूकंपाचे दिल्ली एनसीआरमध्येही धक्के जाणवले. मात्र यादरम्यान आतापर्यंत कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी 24 जानेवारीला नेपाळमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी नेपाळमधील डोटी जिल्ह्यात एक घर कोसळून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नुकतेच गुजरातमधील कच्छ, सिक्कीम, आसाम आणि दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आता भूकंपाच्या संदर्भात अनेक नवीन अभ्यासांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पिथौरागढपासून 143 किमी अंतरावर जमिनीपासून 10 किमी अंतरावर होता. दरम्यान, तुर्कस्तान-सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला होता. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 2 लाखांहून अधिक अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले आहेत.