नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी होती. सकाळी 10.31 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाल्हेरपासून 28 किमी अंतरावर असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, छत्तीसगडच्या अंबिकापूरसह आसपासच्या भागात सकाळी 10.39 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र सूरजपूरमधील भाटगावपासून 11 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वी दोन दिवसापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी होती.
तसेच अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या भूकंपामध्ये कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.