टोकियो – जपानच्या इशान्येकडील भागाला शनिवारी रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे झालेल्या भूस्खलनामुळे महामार्गावर डोंगराचा मोठा भाग कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली. याशिवाय काही इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. काही भागातील बुलेट ट्रेनच्या मार्गांचेही नुकसान झाले आहे. वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे अनेक भागातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. फुकुशिमा आणि मियागी या भागांना या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 10 वर्षांपूर्वी याच भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. त्या भूकंपामुळे त्सुनामी लाटाही उसळल्या होत्या. आणि फुकुशिमा येथील अणू प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले होते.
शनिवारी झालेल्या भूकंपामुळे मात्र त्सुनामी लाटांचा धोका नाही. मात्र या भूकंपामुळे अनेक लहान मुले जखमी झाली आहेत. अनेक जणांच्या अंगावर घरातील वस्तू पडल्या आणि काचेच्या फुटलेल्या तावदानांमुळे अनेक जण जखमी झाले. तीन जणांना गंभीर दुखापत झाली असल्याचे समजते आहे. मात्र कोणीही मृत झाल्याचे वृत्त नाही, असे मुख्य मंत्रिमंडळ सचिव कॅटसुनोबू काटो यांनी सांगितले.
फुकुशिमा दाइ इची आण्विक प्रकल्पाला वीज पुरवठा करणाऱ्या टोकियो उर्जा प्रकल्पाचे काम मात्र 2011 च्या दुर्घटनेनंतर बंदच आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याला जोरदार हादरे बसले आहे. तसेच रिऍक्टरही हादरले आहेत, असे या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रकल्पातून किरणोत्सर्गाची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भूकंपाचा केंद्रबिंदू 55 किलोमीटर खोलवर असल्याने यामुळे त्सुनामी लाटांची शक्यता नाही. रविवारी पहाटे वीजपुरवठा पूर्ववत झाला होता, तरी काही बुलेट ट्रेनची सेवा अद्यापही थांबविण्यात आली आहे. उत्तर किनाऱ्यावरील बुलेट ट्रेनचे नुकसान झाल्यामुळे त्या सोमवारीही थांबविण्यात येतील, असे पूर्व जपान रेल्वे कंपनीने सांगितले. टोकियो आणि उत्तर शहरांना जोडणारा एक मोठा एक मोठा किनारपट्टी महामार्ग भूस्खलन झाल्याने बंद झाला आहे. कामगार हा महामार्ग साफ करीत आहेत.