बीजिंग – चीनच्या नैऋत्येकडील शिचुआन प्रांतात आज आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये किमान तिघा जणांचा मृत्यू झाला, तर 60 जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता 6.0 मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपानंतर शिचुआन प्रांतात दुसऱ्या श्रेणीची आपत्कालिक स्थिती घोषित करण्यात आली. पहाटे 4.33 वाजता लुक्सियान भागात हा भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटरवर होता, असे चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने म्हटले आहे.
जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. या भूकंपामुळे किमान 7 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, तर तब्बल 10 हजार लोकांना सतर्कतेचा उपाय म्हणून अधिक सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.
भूकंपामुळे एकूण 730 घरे पडली आहेत आणि 7,290 घरांचे नुकसान झाले आहे. भूकंप झालेल्या भागात मदत आणि बचाव पथके तैनात झाली आहेत. बऱ्याच मोठ्या भूभागातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे.फुजी भागात पावसाचे थैमान सुरू आहे, त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. भूकंपामुळे खाणींमधील खोदकाम स्थगित करण्यात आले आहे. 2008 साली चीनमधील शिचुआन प्रांतात झालेल्या भूकंपात हजारो लोक मरण पावले होते.