नवी दिल्ली – तुर्कीतील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारत सरकारकडून मदत साहित्य घेतलेले दुसरे विमान आज तुर्कीला रवाना झाले. हवाई दलाच्या सी-17 विमानातून “एनडीआरएफ’चे जवान, श्वानपथक, शोध आणि बचावासाठीची विशेष उपकरणे, खोदकामाची उपकरणे आणि काही विशेष वाहने तुर्कीला रवाना करण्यात आली.
काल झालेल्या भीषण भूकंपानंतर लगेचच भारताच्यावतीने तुर्कीला मानवतावादी भूमिकेतून मदत पाठवण्यात आली होती. तातडीची मदत म्हणून आज दुसरे पथक तुर्कीला रवाना करण्यात आले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
आज रवाना करण्यात आलेल्या मदतीमघ्ये “एनडीआरएफ’चे 50 जवान आणि जखमींचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या विशेष श्वान पथकाचा समावेश आहे.तुर्कीमध्ये सध्या कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या शेकडो लोकांना सोडवणे ही प्राथमिकता आहे.
त्यामुळे या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे मदत साहित्य घेतलेले हवाई दलाचे विमान आज पहाटेच्या सुमारास तुर्कीला रवाना झाले.