फैजाबाद : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या फैजाबाद जिल्ह्यात आज सकाळी 7.06 वाजता हा भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेना याबाबतची माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली असून फैजाबादपासून 285 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू 107 किलोमीटर खोल होता, ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
अफगाणिस्तानला सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी भूकंपाचा झटका बसला. याआधी 8 मार्च रोजी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू 136 किमी खोलीवर होती. भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
यापूर्वी 2 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:35 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबाद भागात 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू 245 किमी खोल होता.