मुंबई -वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयी सलामी दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 18.4 षटकांत पूर्ण करत 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळविला.
सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पाच षटकांत संघाच्या 50 धावा फलकावर लावल्या. शार्दुल ठाकूरच्या पहिल्या षटकात धवन-शॉने 17 धावा वसूल केल्या. त्यानंतर शॉने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉनंतर धवननेही आपले अर्धशतक साकारले. या दोघांनी अकराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.
आक्रमक झालेल्या पृथ्वीला ब्राव्होने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या. धवन शतकाकडे कूच करत असताना शार्दुलने त्याला पायचित केले. धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा केल्या. यानंतर ऋषभ पंतने चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. दिल्लीच्या अवेश खानने दुसऱ्याच षटकात सलामीवीर फाफ डुप्लेसिसला शुन्यावर बाद केले. त्यानंतर पुढील षटकात ऋतुराज गायकवाडला बाद करत ओक्सने चेन्नईला दुसरा झटका दिला. पहिल्या तीन षटकांतच सलामीवीर बाद झाल्याने चेन्नईची 2 बाद 11 अशी अवस्था झाली.
यानंतर मोईन अली आणि सुरेश रैना यांनी डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.
10 षटकात चेन्नईने 3 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आलेल्या अंबाती रायडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. संघाचे शतक पूर्ण केल्यानंतर रैनाने आपले अर्धशतक साकारले. टॉम कुरेनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली.
मोठा फटका खेळण्याच्या नादात रायुडू करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 23 धावा केल्या. 16व्या षटकात रैना दुसरी धाव घेताना धावबाद झाला. त्याने 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रैनानंतर सर्वांची नजर असलेला धोनी मैदानात आला, पण आवेश खानने त्याला शुन्यावर माघारी धाडले.
अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजा आणि सॅम कुरेन यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने 27 चेंडूत 51 धावांची भागीदारी करत संघाला 188 धावांचा टप्पा गाठून दिला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खानने प्रत्येकी दोन, तर आर. अश्विन आणि टॉम कुरेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
वानखेडेवर करोना चाचणी बंधनकारक
करोनाच्या सावटाखाली आयपीएल-2021 हंगामाची सुरुवात झाली आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश करायच्या आधीच करोनाची एन्ट्री झाली असल्याने बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील काही कर्मचारी करोनाच्या विळख्यात सापडले होते. तसेच मुंबईत आयपीएलचा सराव करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल यालाही करोनाची बाधा झाली होती.
आज (10 एप्रिल) याच वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला आहे. तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने वानखेडेत सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक केली. बीसीसीआयच्या निर्णयानुसार, आता सामना पाहण्यास येणाऱ्या मॅच ऑफिशियल्स किंवा खेळाडूंच्या कुटुंबीयांना 48 तासांपूर्वी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
शिखर धवनचा विक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात करत आयपीएलमध्ये अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. धवन आयपीएल इतिहासात 600 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 10 चौकार खेचत कोणत्याला खेळाडूला न केलेला कारनामा केला आहे. धवननंतर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 510 चौकार लगावले आहेत.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 7 बाद 188 (ऋतुराज गायकवाड 5, फाफ डुप्लेसिस 0, मोईन अली 36, सुरेश रैना 54, अंबाती रायडू 23, रवींद्र जडेजा नाबाद 26, महेंद्रसिंह धोनी 0, सॅम कुरेन 34. ख्रिस वोक्स 18-2, आवेश खान 23-2) दिल्ली कॅपिटल्स ः 18.4 षटकात 3 बाद 190 (पृथ्वी शॉ 72, शिखर धवन 85, ऋषभ पंत नाबाद 15, शिमरॉन हेटमीयर नाबाद 0. शार्दुल ठाकूर 53-2)