पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या नोव्हेंबरपासून हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत विद्यापीठ आवारातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील धूळखात पडलेले साहित्य संकलित केले.
प्रशासकीय पत्रव्यवहाराची शासकीय पद्धत रद्द करीत विद्यापीठ प्रशासनाने संकलित केलेल्या खुर्च्या, संगणक, फर्निचर, गाड्या अशा अनेक वस्तूंची लिलावाद्वारे विक्री करीत त्यातून तब्बल सव्वाकोटी रुपयांची कमाई केली.
पुणे विद्यापीठात जवळपस 52 शैक्षणिक विभाग आणि प्रशासकीय विभाग आहेत. गेल्या पाच-वर्षांपासून बहुतांश विभागांत तुटलेल्या खुर्च्या, बंद पडलेले संगणक, खराब फर्निचर अस्तावस्त धूळखात पडल्याचे प्रशासनास निदर्शनास आले.
नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाने डेंग्यू निर्मूलन व स्वच्छता मोहीम हाती घेतले. त्यात ज्या विभागात खराब वस्तू असतील, ती उचलण्यात आले. आवारात ठिकठिकाणी पडलेल्या वस्तू संकलित केल्या. असे सर्व भंगार एकत्र करून त्याची विल्हेवाड लावण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्याचा योग्य भाव मिळण्यासाठी तीन टप्प्यात लिलाव केला. त्यातून साधारणपणे सव्वाकोटी रुपये मिळाले.