दुर्गम असलेल्या भोर तालुक्यात रूजू होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नाखूश असतात. मात्र, जनसामान्यांची नस ओळखून त्यांच्यात एकरूप होऊन प्रशासनातील सेतू बनता येतो, हे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांच्यासह भोर महसूलच्या टीमने दाखवून दिले आहे. करोनाच्या साथीवेळी भोरच्या महसूल प्रशासनाने प्रभावी आणि व्यापक उपाययोजना राबविल्याने करोनावर मात करता आली.
पंचायत समिती, नगरपलिका, तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून एकजुटता दाखवली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महसूलने युक्ती वापरली. तसेच संपूर्ण महसूच्या यंत्रणेतून शक्ती पणाला लावली. या सर्व काळात आपल्या जबाबदारीवर आणि कामावर भक्ती कायम ठेवली. हा सहभाग खऱ्या अर्थाने महसूल आणि प्रशासनातील इतर विभागातील यश “अधोरेखित’ करणारा ठरला आहे.
दुर्गम भोर तालुक्यातील गावांतून घरटी एक नागरिक पुणे, मुंबई येथे नोकरीसाठी स्थलांतरित झाले आहेत. मार्चमध्ये जागतिक महामारीचा संसर्ग महाराष्ट्रात पोहोचला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाने करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे भोरचे महसूल प्रशासन सतर्क होऊन कामाला लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नेरे गावात पहिला करोना बाधित आढळला. त्यामुळे महसूलसह अन्य विभागांवर ताण होता.
करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान होते. महसूलमधील कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील हे करोना योद्धे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्राऊंड लेव्हलवर उतरले. या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. सुरुवातीला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, सर्व विस्तार अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, सर्व प्रशासकीय यंत्रणेत समन्वय साधून नेरे गाव कंटेन्मेंट झोन जाहीर केले. भोर शहरात प्रभावी उपाययोजना राबवून आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागली.
करोनाविरोधात लढा देण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली. पहिल्यांदा बाधितांना हाय रिस्कमध्ये ठेवले होते. त्यांची व्यवस्था केली. मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतून भोर तालुक्यात 33 हजार लोकांनी गावी स्थलांतर केले होते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही महामार्गालगत शैक्षणिक संकुल, भोर शहरात करण्यात आली. त्यांना क्वारंटाइन केल्यानंतर महसूलने त्यांची पुरेपूर काळजी घेतली होती. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व तीव्र लक्षणे असलेल्या बाधितांसाठी सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी व्यवस्था केली. बाधितांसाठी व्हेंटीलेटरची सोय झाल्याने तालुक्यात उपचार होऊ शकले. हे मोठे यश होते.
…अन् कामगारांचा प्रश्न निकाली
राष्ट्रीय महामार्गावर किकवी, नसरापूर तसेच भोर शहरात स्थलांतरित कामगारांसाठी तात्पुरते निवारागृह स्थापन केले. त्यांना निवारा देत जेवणाची व्यवस्था केली. पुणे- सातारा महामार्गावरील खासगी कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार आणि स्थानिक तरूण, कामगारांचा समावेश होता. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याने त्यांचा संपूर्ण खर्च सामाजिक संस्था, खासगी कंपन्यांनी उचलला. यावेळी आर्थिक आणि धान्य स्वरूपात सामाजिक संस्था आणि कंपन्यांचे शेकडो हात मदतीसाठी पुढे येत होते. या शिधा किटमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. सुमारे 10 हजार हजार फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कामगारांचा प्रश्न निकालात निघाला.
ग्रामदूत संकल्पना यशस्वी
भोर तालुक्यातील अर्थकारण, उपजीविकेचे साधन तोकडे आहे. करोना साथीवेळी वाहतूक दळणवळणाच्या सुविधा ठप्प होत्या. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ग्रामदूत संकल्पना राबविण्यात आली. गावात दोन ग्रामदूतांची नेमणूक करण्यात आली. त्या ग्रामदूताला भोर, नसरापूर अथवा मोठ्या गावातील बाजारपेठेतून धान्य आणि जीवनावश्यक साहित्य आणण्याची जबाबदारी सोपविली. हे साहित्य गरजू कुटुंबांना द्यायचे, ही उपाययोजना राबविली. त्यामुळे ग्रामदूत हे खऱ्या अर्थाने गावकऱ्यांसाठी देवदूतच ठरले होते.
निवडणूक काळातही दक्षता
भोर महसूल प्रशासनाने प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील हे सर्व विभागातील यंत्रणेत समन्वय साधून कार्यरत होते. त्यावेळी अनलॉकमध्ये पदवीधर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मतदानादिवशी मतदारांत सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, मास्क आदींचे पालन करून लोकशाहीचा उत्सव पार पडला. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा कार्यरत असताना सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे करोनाच्या महामारीत पोलीस स्टेशन, अन्य विभागाच्या पाठबळावर भोर महसूलचे प्रशासन यशस्वी ठरले आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ने आरोग्य सदृढ
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचा “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी 110 पथकांकडून भोर शहरातील 16 हजार जणांची आरोग्य तपासणी केली. यात आढळलेल्या बाधितांवर उपचार करून करोनाची साखळी तोडण्यात महसूलला यश आले. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साथ दिल्याने भोर तालुका करोनामुक्तीच्या वाटेवर जाऊ लागला. यावेळी महसूल विभागाने सोशल मीडियाचा वापर कौशल्याने केला आहे.
करोना प्रतिबंधक लस येण्यापूर्वी नागरिक सजग, सतर्क राहण्यासाठी एक व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आले. यावेळी जनजागृती, प्रबोधनाचा आराखडा बनविला होता. तालुक्यातील चार ठिकाणी कोविड सेंटर उभारले. त्याठिकाणी सर्व सुविधा दिल्यामुळे बाधितांवर वेळेत उपचार होऊ लागले. त्यामुळे करोनाचा आलेख घटण्यासाठी मदत झाली. हे महसूलचे यश होते.
सामाजिक संस्था, खासगी कंपन्यांचे योगदान
भोर तालुका हा अतिदुर्गम आहे. या तालुक्यात सुविधा आणि रोजगाराच्या संधी तुटपुंज्या आहेत. याची जाणीव ठेवत अनेकजणांनी हातभार लावला आहे. पुण्यातील साधू वासवानी मिशन, ध्रुव प्रतिष्ठान, होप्स फाऊंडेशन, उद्योजक भावनेश देसाई, डब्यू एम आदी कंपन्यांचे योगदान सामाजिक बांधिलकी जोपासणारे होते. त्यामुळे महसूल प्रशासनाला गती आली.
परप्रांतीय मजुरांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. जेजुरी देवस्थान, किराणा दुकानदारांनी स्थलांतर मजुरांना दिलासा दिला. त्यामुळे महसूलच्या मदतीत खारीचा वाटा उचलला. एसटीने 6 हजार 500 परप्रांतीय मजुरांना परराज्यात सोडण्यात आले. ही सर्व व्यवस्था भोर महसूलने चोख आणि नियोजनबद्ध बजावली.
शब्दांकन
भुजंगराव दाभाडे
भोर तालुका प्रतिनिधी