पुणे- शहरासह राज्यात करोनाचे संकट उभे आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे “या पावसालाही आत्ताच यायचे होते का’ अशी संतप्त प्रक्रिया नागरिकांमध्ये येऊ लागली आहे. नेहमी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांकडून मात्र “आता पडू नको’, अशी विनवी केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 24) पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी काही उपनगर भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हवामानात बदल झाला असून, हे हवामान आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
काल रात्रीपासून उकाडा वाढलेला होता. तर आज दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. सायंकाळी कात्रज, आंबेगाव यासह उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सध्या शहरात संचारबंदी असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असल्यामुळे नेहमी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची होणारी तारांबळ दिसली नाही. मात्र, या पावसामुळे शहरातील कमाल आणि किमान तापामानात घट झाली आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दमट हवामान किंवा पाऊस यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आजार वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली आहे. तर कोकण-गोव्याच्या काही भागात किंचीत वाढ आणि विदर्भाच्या काही भागात किंचीत घट झाली आहे. पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. साधारण 28 मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.