बारणेंच्या निवासस्थानासमोर सकाळपासूनच उत्साह

आणि कार्यालये झाली रिकामी

निकालाच्या दिवशी शिवसेना-भाजप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयामध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. प्रत्येक जण टिव्हीवर निकाल पाहत होता. मात्र, तिसऱ्या फेरीनंतर श्रीरंग बारणे यांचे मताधिक्‍य वाढत असताना राष्ट्रवादीच्या कार्यालयातून कार्यकर्त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. तर इकडे शिवसेना व भाजप कार्यालयात मताधिक्‍यामध्ये वाढ होताना गर्दीही वाढली होती. बारणे यांचे मताधिक्‍य एक लाखांच्या पुढे गेल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला आणि मतमोजणी केंद्राकडे धाव घेवून जल्लोष करण्यास सुरवात केली.

पिंपरी – अत्यंत चुरशीची वाटत असलेली मावळची लढाई खासदार श्रीरंग बारणे यांनी एकतर्फी जिंकली. सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून बारणे यांचे मताधिक्‍य वाढायला सुरवात झाल्यानंतर त्यांचे थेरगाव येथील निवास्थानावरही कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी वाढू लागली. त्यांचे मताधिक्‍य लाखांच्या पुढे गेल्यानंतरच त्यांच्या निवास्थानासमोरच समर्थकांनी जल्लोष करायला सुरवात केली. बारणे यांचे मताधिक्‍य जसे-जसे वाढत गेले तसे-तसे त्यांच्या निवास्थानासमोरील गर्दी वाढू लागली होती.

मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीच आव्हान दिल्यामुळे ही निवडणूक बारणे यांना जड जाईल अशी शक्‍यता सर्वच स्तरातून व्यक्‍तकरण्यात येत होती. प्रचारादरम्यानही अनेकदा असेच चित्र दिसून आले. मात्र, आज मतमोजणीच्या वेळी पहिल्या फेरीपासूनच निकाल बाहेर येताना ही निवडणूक बारणे यांना मागच्या निवडणुकीपेक्षा सोपीच गेल्याचे दिसून आले. पहिल्या फेरीपासूनच बारणे यांचे मताधिक्‍य वाढायला सुरवात झाली. त्यांचे मताधिक्‍य प्रत्येक फेरीनुसार वाढत असताना त्यांचे थेरगाव येथील “श्री’ या निवासस्थानी शिवसैनिक आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढायला सुरवात झाली. दुपारी एक वाजताच्या सुमारास तर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. बारणे यांचे मताधिक्‍यही एक लाखांच्या पुढे गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयोत्सवास सुरुवात केली.

बारणे यांचे मताधिक्‍य दीड लाखांच्या पुढे गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करायला सुरवात केली. तसेच बारणे यांच्या निवास्थाबाहेरील गर्दीही वाढण्यास सुरवात झाली. दुपारी अडीचच्या सुमारासच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व डी.जे लावून आनंदोत्सव साजरा केला. दुपारी तीन वाजताच्या सुमारास खासदार श्रीरंग बारणे हे आपल्या निवास्थासमोरील कार्यालयाच्या बाहेर येवून सर्वांच्या शुभेच्छा स्विकारल्या व मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.