स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे लवकरच सुशोभिकरण- आ.संग्राम जगताप

नगर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्व भारतीयांमध्ये स्वातंत्र्यासाठी ज्योत पेटवून क्रांती घडविली व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आताच्या तरुण पिढीला अशा महान व्यक्तीच्या कार्याची माहिती व विचार पटवून देणे गरजेचे आहे. जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तरुणांपर्यंत हे विचार पोहचतील. नगरमध्ये चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचा निर्णय घेतला असून, महानगरपालिकेला सुशोभिकरणाचा प्रस्तावही दिला आहे. लवकरच आमदार निधीतून हे काम होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळ व सावरकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी, मयुर जोशी, सुहास मुळे, डॉ.झेंडे, ऍड.प्रसन्न जोशी, रोहिणी पुंडलिक, प्रिया जानवे, प्रसाद कुलकर्णी, श्रीनिवास बडवे, योगेश कुलकर्णी, वैभव जोशी, विभव निसरगंड, महेश कुलकर्णी, सप्तर्षी, नंदू जोशी, दिपक सूळ, कैलास दळवी, प्रा.माणिक विधाते, अमोल भंडारे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मृत्यंजयकार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो.अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रास्तविकात मयुर जोशी म्हणाले, चौपाटी कारंजा येथे दरवर्षी पुरोहित मंडळ व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात येते. आ.संग्राम जगताप यांनी या ऐतिहासिक ठिकाणाचे सुशोभिकरण करण्याचे आश्‍वासन दिले असून, लवकरच प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले तर आभार किशोर जोशी यांनी मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×