आधी वाहतूक कोंडीचा कहर, त्यात अतिक्रमणांना बहर

कराड शहरातील स्थिती; गर्दीतून वाट काढताना होतेय घालमेल
सुरेश डुबल
कराड – कराड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. त्यात भर म्हणून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे होत आहेत. वाहतूक कोंडीमधून वाट काढताना वाहनचालकांची घालमेल होत आहे. वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर कसा मार्ग काढायचा, असा प्रश्‍न प्रशासना पडला आहे.

शहरातील वाहतूक कोंडीबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. या वाहतूक कोंडीला अस्ताव्यस्त व बेजबाबदारपणे होणारे पार्किंग आणि जागा मिळेल तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात झालेली अतिक्रमणे जबाबदार आहेत. रस्त्यात थाटलेली दुकान आणि परवाना नसलेले हातगाडे यांच्या अतिक्रमणांनी रस्त्याचा 40 टक्‍के भाग व्यापला आहे. राहिलेल्या 60 टक्‍के रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होत आहे. बसस्थानक परिसरातील कर्मवीर भाऊराव चौक ते पोस्ट ऑफिसपर्यंतचा रस्ता, तृप्ती हॉटेलपासून न्यायालयापर्यंतचा रस्ता, राज मेडिकल ते बापूजी साळुंखे पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढलेली आहेत.

बसस्थानकासमोर कर्मवीर भाऊराव चौकातील सिग्नलची तमा न बाळगता वडाप वाहतुकीच्या गाड्या कधीही, कोठेही आणि कशाही थांबवून प्रवासी उतरवले व बसवले जात आहेत. या रस्त्यात काही हातगाड्यांची अतिक्रमणे आहेत. या हातगाड्यांभोवती होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक समस्येत भर पडत आहे.

बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर खेडेगावातील लोक मंडईत जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. वाहतूक कोंडीमुळे दुचाकीस्वारांनाही वाट काढता येत नाही, तिथे पादचाऱ्यांना कोण विचार करणार, अशी स्थिती आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे व अस्ताव्यस्त पार्किंगच्या समस्येवर पालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here