#INDvENG T20 : कोहलीच्या नेतृत्वात खेळण्यास उत्सुक – सूर्यकुमार

जयपूर – अमिरातीत गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत थेट विराट कोहलीशीच पंगा घेतलेल्या सूर्यकुमार यादवने त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. कोहलीकडे अफाट क्षमता आहे, तो पूर्ण सकारात्मक असतो, त्यामुळे त्याच्या नेतृत्वखाली खेळताना खूप काही शिकायला मिळेल, असेही तो म्हणाला.

मी आयपीएलमध्ये कोहलीविरुद्ध खेळलो आहे. त्याच्यात कायमच सकारात्मकता दिसून येते. तो मैदानावर नेहमीच उत्साही असतो. कोहलीला संघाच्या विजयाचे महत्त्व अवगत आहे व त्यासाठी वैयक्तीक कामगिरी बरोबरच सांघिक कामगिरीतही कशी प्रगती होईल यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मी अतूर आहे, असेही सूर्यकुमार म्हणाला. मला कोहलीसह यापूर्वी कधीही ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली नाही. आता ते स्वप्नही पूर्ण होणार आहे. मला कोहलीकडून खूप काही शिकायचे आहे, असेही त्याने सांगितले.

अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात कोहली व सूर्यकुमार यांच्यामध्ये एक नाट्य घडले होते. कोहलीच्या संघाला त्याला लवकर बाद करायचे होते व त्यामुळे कोहलीने त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकला होता. त्यावेळी सूर्यकुमार मात्र, अत्यंत शांत राहिला. त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले होते तर, कोहलीवर टीका केली होती. कोहलीने सूर्यकुमारला डिवचण्याचाही प्रयत्न केला होता. यावरून या दोन खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, सूर्यकुमारने हे सर्व फेटाळले आहे. एखाद्या सामन्यात अशा काही घटना घडल्या तरी त्याचा परिणाम खेळाडूंच्या एकमेकांशी असलेल्या संवादावर होत नाही. कोहली अशा घटना विसरून प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करतो, त्यामुळेच एक कर्णधार म्हणून मला तो भावतो, असेही सूर्यकुमार म्हणाला.

सूर्यकुमारला इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेत जर सूर्यकुमारने आपली गुणवत्ता सिद्ध केली तर तो त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टी-20 क्रिकेटसाठी भारतीय संघात कायमस्वरुपी स्थान राखू शकतो.

दोन्ही संघ खालील प्रमाणे

भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी व शार्दुल ठाकूर.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

12 मार्च – पहिला सामना अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
14 मार्च – दुसरा सामना अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
16 मार्च – तिसरा सामना अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
18 मार्च – चौथा सामना अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
20 मार्च – पाचवा सामना अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता

इंग्लंड संघ : इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, रिस टोपेल व मार्क वुड.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.