चेन्नई – कसोटी फलंदाज असा शिक्का बसलेला चेतेश्वर पुजारा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. संघाच्या सराव सत्रात पुजाराची आक्रमक फलंदाजी पाहून याला चेन्नईच्या संघात आल्या आल्या लगेचच धोनीचा वाण नव्हे; पण गुण लागला असेच चित्र दिसून आले. अशाच शब्दांत चाहत्यांनी पुजाराचे सोशल मीडियावर कौतुकही केले आहे.
पुजारा आयपीएलच्या सुरुवातीच्या स्पर्धेत खेळला होता, त्यानंतर त्याची संथ फलंदाजी केवळ कसोटीसाठीच उपयोगी आहे असे मानले जाऊ लागले व त्याच्यावर कसोटी फलंदाज असा शिक्काही बसला. त्यानंतर त्याला आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने घेतले नव्हते. मात्र, यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने सामना वाचवणाऱ्या तसेच काही वेळा आक्रमक खेळी केल्यामुळे त्याला लिलावात धोनीच्या चेन्नई संघाने घेतले. ही खरेतर पुजारासाठीही आश्चर्याची बाब होती. मात्र, या स्पर्धेसाठी चेन्नई संघाचा सराव सुरू झाल्यावर पुजारानेही आपल्या फलंदाजीच्या शैलीत मागणीनुसार पुरवठा असा बदल केल्याचे दिसून येत आहे.
चेन्नई संघाच्या सराव सत्रात पुजाराने चौकार व षटकारांच्या बरसातीने खुद्द धोनीलाही सुखद धक्का दिला.नेटमध्ये सराव करताना चौकार व षटकारांची बरसात करताना पुजाराची फलंदाजी व त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट होत आहेत. या व्हिडिओत पहिल्या फ्रेममध्ये धोनी उत्तुंग षटकार मारत असल्याचे दिसून येते तर दुसऱ्या फ्रेममध्ये असेच उत्तुंग षटकार पुजाराच्याही बॅटमधून दिसत आहेत.
धोनीच्या नेतृत्वात खेळण्यास उत्सुक
टी-20 सामन्यांचा सराव सुटला होता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा या प्रकारचे क्रिकेट खेळायला मिळत आहे याचा तर आनंद आहेच; पण त्याहीपेक्षा जास्त आनंद धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आहे, असे मत पुजाराने व्यक्त केले आहे. धोनी हा कायमच माझ्यासाठी आदर्श खेळाडू होता, आहे व राहील. त्याच्याकडे क्रिकेटचे ज्ञान आहे, तसेच त्याचे सल्ले प्रत्येक वेळी लाभदायक ठरतात. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्याच्याबरोबर खेळण्याचा आनंद काही औरच असेल, असेही पुजारा म्हणाला.
देशापेक्षा आयपीएल महत्त्वाची नाही – वॉन
आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी जर देशाकडून खेळण्यास कोणा खेळाडूने नकार दिला तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. देशाच्या संघापेक्षा आयपीएल महत्त्वाची नाही, असे परखड मत इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक मायकल वॉन याने व्यक्त केले आहे. जे खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएलमधील संघाला महत्त्व देतात, त्यांना निवृत्त करण्यात यावे किंवा भविष्यात राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी अशा खेळाडूंचा विचार केला जाऊ नये, असेही वॉनने म्हटले आहे.