जुन्नर तालुक्‍यातील सहकारातील दूरदृष्टी असलेले नेतृत्व अॅड. संजय शिवाजीराव काळे

सहकारमहर्षी शिवाजीराव (दादा) काळे हे जुन्नर तालुक्‍याचे माजी आमदार व जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील दबदबा असलेले नेतृत्व होते. शिवाजीदादांच्या नंतर तो वारसा नेण्याचे कार्य त्यांचे चिरंजीव विद्यमान सभापती ऍड. संजय काळे यांनी केले. काळे यांनी जिल्हा बॅंक आणि बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवून शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे काम करीत आहेत. सर्वसामान्यांच्या विकासाचे राजकारण, शिक्षणात आधुनिकीकरणाची कास, शेतकरी वर्गाचा बाजार समितीच्या व जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून निकडपूर्ती करण्याचा ध्यास घेऊन तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्यात सामाजिक व राजकीय वर्तुळात स्वतःच्या कार्यशैलीतून आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे ऍड. संजय काळे हे कर्तृत्व संपन्न नेतृत्व जुन्नर तालुक्‍याला लाभले आहे.

ऍड. संजय काळे यांना सहकाराचे बाळकडू घरातच मिळाले. शेतकऱ्यांचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काळे यांनी बाजार समितीत जबाबदारीने काम करत असताना महाराष्ट्रातील अग्रगण्य दहा बाजार समित्यांमध्ये जुन्नर बाजार समितीचे नाव नावरूपास आणले. शेतकरी बांधव हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक धाडसी निर्णय घेऊन बाजार समितीचा कायापालट केला. सभापतिपदाची धुरा सांभाळत असताना 2004 ला नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट सुरू केले. त्यामुळे या टोमॅटो मार्केटचे नाव आज देश व विदेश पातळीवर गेले आहे. देशातील व विदेशातील अनेक बाजार समितीचे पदाधिकारी, शेतकरी, विविध कृषी क्षेत्रातील कंपनीचे अधिकारी नारायणगाव टोमॅटो मार्केटला भेट देण्यासाठी येत असतात. नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. परराज्यातील शेकडो टोमॅटो व्यापारी या उपबाजार केंद्रात येऊन माल खरेदी करून शेतकऱ्यांना रोख स्वरूपात त्यांच्या मालाचे पैसे अदा करतात.

सुरुवातीला 60 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असणारी मार्केट कमिटी आजमितीस 1 हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडत आहे. याच उपबाजार केंद्रात भाजीपाला (तरकारी)साठी देखील मोठ्या स्वरूपात मार्केट उपलब्ध झाले आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांना सकाळी 9 ते दुपारी 3 ही वेळेची मर्यादा निश्‍चित करण्यात आली. या वेळेत बाजार समितीच्या उपकेंद्रात लायसन्सधारक व्यापाऱ्याकडूनच शेतकऱ्यांनी टोमॅटो खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत. त्यासाठी त्यांना बाजार समितीच्या वतीने ओळखपत्र दिले.

लायसन्सधारक नसणाऱ्या व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी-विक्री व्यवहार करू नयेत अन्यथा अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. टोमॅटोचे लिलाव सकाळी 9 वा. सुरू होईल. सकाळी 9 वा. ठरविलेला बाजारभाव हा दुपारी 3 पर्यंत प्रतवारीनुसार राहील. आवारात बाजारभाव फलक लावण्यात येईल व बाजार समितीचे अधिकृत लायसन्सधारक असलेले व्यापारी यांची नावे व त्यांचे फर्म याची माहिती लावली जाईल. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाजार समितीने दिलेली पावती बाजारभाव टाकून देणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांकडील कामगारांना एकसारखे ड्रेसकोड असतील. त्यांची शारीरिक स्वच्छता रोज असणे गरजेचे आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे रोख देणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना दिलेले चेक बाउन्स होणार नाहीत याची काळजी घ्या, शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. असे महत्त्वपूर्ण निर्णय नारायणगाव उपबाजार केंद्राच्या बैठकीत ऍड. काळे यांनी घेतले आहेत.

जुन्नर तालुका शेतीप्रधान तालुका असल्याने भविष्यातील शेतीच्या बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतर शेतीमाल विकण्यासाठी वारूळवाडी गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर 13 एकर क्षेत्र खरेदी करून या ठिकाणी अद्ययावत टोमॅटो मार्केट उभारणीचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांत हे मार्केट सुरू होणार आहे. या नियोजित मार्केटमध्ये सुसज्ज शीतगृह, शेतमालाची सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी शेतकरी निवास अंतर्गत पार्किंग हमाल, मापाडीसाठी भवन व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आळेफाटा येथे शेतकऱ्यांसाठी डाळिंबाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. जुन्नर येथे सुसज्ज असे शेतकरी निवास, गाळे बांधण्यात आलेले आहेत. अशा दूरदृष्टी असणाऱ्या सर्वगुण संपन्न असलेले ऍड. संजय काळे यांना वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्‍यातील तमाम जनतेच्या वतीने मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.