दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रिलीजपूर्वी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे.
आदिपुरुषची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होत. टिझर वरून वाद झाल्यानंतर चित्रपटाच्या सीनमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली यासह बजेटमध्ये देखील वाढ झाली. 500 कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर, सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाने रिलीजआधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या 10 दिवस आधीच निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी, निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये ‘भगवान हनुमानासा’ठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे.
आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा चित्रपटाच्या टीमनं केली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता ‘देवदत्त नागे’ हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.