#CWC19 : प्रत्येक सामना महत्त्वाचा – जो रूट

बर्मिगहॅम – ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यामुळे आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी आम्हाला प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यातही रविवारी भारतावर विजय मिळविण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत असे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जो रूट याने सांगितले.

ऑस्ट्रेलियासारख्या पांरपरिक प्रतिस्पर्ध्याकडून झालेल्या पराभवानंतर येथील प्रसार माध्यमांनी इंग्लंड संघावर तोंडसुख घेतले आहे. बाद फेरीसाठी त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. उर्वरित प्रत्येक सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळविणे महत्त्वाचे आहे. रूट म्हणाला की, आमच्याकडे विजेतेपद मिळविण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने प्रत्येक लढतीत आम्हाला शांतचित्ताने व सकारात्मक वृत्तीने खेळावे लागणार आहे. जेसन रॉय हा तंदुरूस्त झाल्यामुळे आमची फलंदाजीची बाजू भक्कम होणार आहे. आगामी लढतींबाबत चाहत्यांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना आम्ही नाराज करणार नाही. घरच्या मैदानावर खेळायचे जसे फायदे असतात तसे काही तोटेही असतात. घरच्या प्रेक्षकांचे मोठे दडपण असते. हे दडपण कसे कमी करता येईल याचा आम्ही विचार करीत आहोत.

भारताविरुद्धच्या लढतीविषयी रूटचा सहकारी आदिल रशीद म्हणाला की, हा सामना निश्‍चितपणे रंगतदार होईल व आम्ही त्यामध्ये विजय मिळवू अशी मला खात्री आहे. कधी कधी प्रेक्षकांची निराशा होते. आता तसे घडणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.