दुकानाबाहेरील रांगा टाळण्यासाठी उपाय
पुणे – लॉकडाऊन सुरु झाल्याने 40 दिवसांपेक्षा अधिक काळ दारुची दुकाने बंद राहिल्याने अनेक मद्यपींना ती सहजासहजी उपलब्ध होत नव्हती. लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडली आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत लोकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने दुकानांबाहेरील रांगा टाळण्यासाठी ई-टोकनची युक्ती शोधली आहे.
मंगळवारपासून पुण्यात “महाएक्साईज डॉट कॉम” (http://www.mahaexcise.com/) या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर ग्राहकांना ई-टोकन मिळणार असून आपल्या घराजवळील दारु दुकानात रांगेत न थांबता थेट जाऊन दारु विकत घेता येऊ शकणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व परिसरातील 179 दुकानांत हा प्रयोग सुरू केला असून त्याची परिणामकारकता पाहून तो राज्यभरात अंमलात आणला जाणार आहे. ई-टोकनसाठी “महाएक्साईज’च्या संकेतस्थळावर ग्राहकांनी नोंदणी करून त्यांचा नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, दारुचा प्रकार ही माहिती भरावयाची आहे.
त्यानंतर त्याचे घराजवळील दारु दुकानांची माहिती दिसून येईल आणि त्यापैकी एक दुकान निश्चित करून त्यास संमती दिल्यानंतर अर्ध्या तासाचे वेगवेगळे स्लॉटस देण्यात आले असून आपल्याला सोईस्कार स्लॉट निश्चित केल्यानंतर ई-टोकन उपलबब्ध हेणार आहे. सदर ई-टोकन दुकानात जाऊन थेट दाखविल्यास मद्य सहजरित्या उपलब्ध होऊ शकणार आहे.